

प्रभाग क्रमांक 20 मध्ये विविध विकासकामे रखडली आहेत. डोंगर- माथ्यावर दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकंना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा वर्षांपासून महेश सोसायटी चौकात ड्रेनेज लाइनचे काम अर्धवट आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांचा अभाव आदी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या भागात मुलांना खेळण्यासाठी एकही क्रीडांगण उपलब्ध नाही.
के. के. मार्केट परिसरातील कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मिती आणि बायोगॅस प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. पद्मावती परिसरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन मागील रिकाम्या जागेत जलतरण प्रकल्पाचे काम काही वर्षांपासून रखडलेले आहे. भगली हॉस्पिटल ते सातारा रस्तादरम्यान कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधण्यात आलेला पुलही बंद आहे.
माजी नगरसेवकांनी प्रभागाचा अपेक्षित विकास केली नाही. कोरोना काळात बराचसा निधी परत गेला होता. के. के. मार्केट परिसरातील महापालिकेच्या जागेतील ट्रक टर्मिनलची जागा हरवली आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदपथांवर अतिक्रमणे करून स्वतःची कार्यालये उभारली आहेत. अंतर्गत भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिसराच्या विकासासह विविध प्रश्न आणि समस्यांना जबाबदार कोण आहे?
अक्षय माने, रहिवासी
स्मशानभूमी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहेत. महेश सोसायटी चौकात गेल्या सहा वर्षांपासून ड्रेनेज लाइनचे काम अर्धवट असल्याने पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. डोंगरमाथा परिसरात गोरगरिबांच्या घरांची अनधिकृत बांधकामे त्वरित पाडली जातात. परंतु इतर अनधिकृत बांधकामे प्रशासनाला दिसत नाहीत का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय ते स्वामी विवेकानंद रस्त्यावर दररोज सायंकाळनंतर वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यांवरील ड्रेनेज लाइन चेंबर ठिकठिकाणी नादुरुस्त झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे.
पावसाळ्यात बिबवेवाडी स्मशानभूमीत तुंबणारे पाणी शेजारील श्रीसद्गुरू आंगण सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरत आहे. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेले महेश सोसायटी चौकातील ड्रेनेज लाइनचे काम पूर्ण होणार कधी? स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. बिबवेवाडी परिसरातील अवजड वाहतूक थांबणार कधी? पापळवस्ती भागातून वर्षांनुवर्षे ड्रेनेज लाइनचे पाणी वाहत आहे.
रामविलास माहेश्वरी, रहिवासी.
प्रभाग कंटेनरमुक्त केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्यांवर ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. पदपथांवर व्यावसायिकांची अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यांवरून चालावे लागत आहे. काही राजकीय नेत्यांनी पदपथांवर कार्यालये थाटली आहेत. प्रशासनाला प्रभागातील अतिक्रमणे दिसत नाहीत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागील महापालिकेच्या निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकास केला नाही. तसेच केलेल्या विकासकामांमध्ये देखील त्रुटी राहिल्या आहेत. जनतेच्या कर रुपातून गोळा केलेल्या पैशांचा योग्य वापर होत नाही. तसेच सुविधा कमी आणि असुविधाच जास्त होत असल्याचे प्रभागातील नागरिकांनी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात अंतर्गत रस्ते, पदपथांची दुरुस्ती, सांस्कृतिक भवन, उद्यान आणि पाण्याच्या टाक्यांची कामे केली आहेत. आमदार निधीतून महेश सोसायटी चौक ते के. के. मार्केटदरम्यान मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आहे. कार्यकाळात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून प्रभागाचा कायापालट केला आहे. कोरोना काळात थोडा निधी परत गेला.
मानसी देशपांडे, माजी नगरसेविका
प्रभागात या भागांचा समावेश...
अप्पर चाळ, अप्पर ओटा, महेश सोसायटी, चिंतामणीनगर
भाग 1, 2, 3 . इंदिरानगर लोअर, के. के. मार्केट, नीलकमल गृहरचना संस्था, बिबवेवाडी गावठाण, प्रसाद बिबवेनगर, आईमाता मंदिर परिसर, गंगाधाम फेज 1 व 2, वर्धमानपुरा, ईशा एमरलाड, गगन गॅलेक्सी, आनंदनगर, झाला कॉम्प्लेक्स, स्नेहनगर, सूर्यप्रभा गार्डन, केंजळेनगर, पारिजात सोसायटी, बिबवेवाडी ओटा, अनिकेत सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, रम्यनगरी, संत एकनाथनगर भाग 1 व 2, पापळवस्ती, पोकळेवस्ती, शाहू सोसायटी, मुद्रा सोसायटी, सिटीप्राइड सिनेमा हॉल परिसर.
प्रभागातील प्रमुख समस्या
डोंगरमाथ्यावर वाढत असलेली अनधिकृत बांधकामे
महेश सोसायटी चौकात रखडलेले ड्रेनेज लाइनचे काम
बिबवेवाडी गावठाण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
रस्त्यांवर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी
अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर साचलेले कचऱ्योच ढीग
पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे
मुलांना खेळण्यासाठी मैदानाचा अभाव
अवेळी व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा
महापालिकेच्या सीताराम आबाजी बिबवे या शाळेसह परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. क्रीडा संकुल उभारण्याचे कामही करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद रस्ता ते भगली हॉस्पिटलदरम्यानचा रस्ताही तयार केला आहे. स्वामी विवेकानंद पुतळा परिसर सुशोभीत करण्यात आला आहे. अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीची कामेही केली आहेत.
राजेंद्र शिळीमकर, माजी नगरसेवक
माननीयांनी द्यावीत या प्रश्नांची उत्तरे
महेश सोसायटी चौक परिसरात रखडलेले ड्रेनेज लाइनचे काम कधी पूर्ण होणार?
बिबवेवाडी डोंगरमाथ्यावरील आरक्षण उठणार का?
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?
ड्रेनेजची समस्या कायमस्वरूपी कधी सुटणार?
मुलांना खेळण्यासाठी मैदान मिळणार कधी?
भगली हॉस्पिटल ते सातारा रस्ता यादरम्यानचा पूल कधी खुला होणार?
आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध होणार कधी?
के. के. मार्केटशेजारी कंपोस्ट खतनिर्मिती प्रकल्प नियमित सुरू कधी होणार?
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाजवळ जलतरण तलाव होणार कधी?
प्रभागात झालेली विकासकामे
आमदार निधीतून महेश सोसायटी चौक ते
के. के. मार्केटदरम्यान टाकलेली ड्रेनेज लाईन
बिबवेवाडी ओटा परिसरात उद्यान आणि गोपीनाथ मुंडे सांस्कृतिक भवनची उभारणी
परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरुस्ती
परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या टाक्या
प्रेमनगर भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र
सीमाराम बिबवे विद्यालयात उभारले क्रीडा संकुल
सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती
रस्त्यावर ठिकठिकाणी पथदिवे बसविले