

खेड : लादवड कोळेकरवस्ती, (ता खेड) येथे गुरुवारी (दि. २७) एका २३ वर्षीय युवकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. केतन श्यामराव कारले असे या घटनेतील मृत युवकाचे नाव आहे. केतन हा टाटा फिकोसा कंपनीत नोकरी करत होता, त्याची पत्नी कुमकुम (वय, २१) यांच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी शुभम संतोष तांबे (वय, २१) आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिली.
कुमकुम यांच्या तक्रारीनुसार, त्या आणि त्यांचे पती केतन गुरुवारी सकाळी खेड न्यायालयात एका प्रलंबित खटल्याच्या तारखेसाठी घरून निघाले होते. ते काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून (एमएच १४ केवाय ३७७०) प्रवास करत होते. लादवडच्या कोळेकरवस्ती येथे पोहचल्यावर कुमकुम यांनी वॉशरूमसाठी थांबण्यास सांगितले. केतन यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कुमकुम बंद दुकानाच्या मागे गेल्या. तेव्हाच दोन-तीन गोळ्यांच्या आवाजाने त्या घाबरल्या आणि बाहेर येऊन पाहिले असता, शुभम तांबे हा त्याच्या मोटारसायकलवर बसलेला होता आणि त्याच्या हातात पिस्तूल होते. त्याच्याबरोबर दोन अज्ञात व्यक्ती होत्या, ज्या केतन यांच्या दुचाकीवर बसल्या होत्या.
कुमकुमने आरडाओरड केली, तेव्हा शुभम आणि त्याचे साथीदार माझ्या पतीची मोटारसायकल घेऊन पळून गेले. त्यांनी तातडीने सासू जानता कारले यांना फोन केला. सासू घटनास्थळी पोहचल्या आणि दोघींनी एका पिकअप गाडीच्या मदतीने केतन यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
हे प्रकरण जुन्या वैमनस्य आणि न्यायालयीन खटल्याशी संबंधित असल्याचे आढळून आले आहे. कुमकुम यांच्या सांगण्यानुसार, केतन यांचे शुभम तांबे आणि अंकुर रमेश कारले (वय २३) यांच्याशी पूर्वीचे मैत्रीचे संबंध होते. सन २०२२ मध्ये कुमकुम आणि केतन यांचे लग्न झाले. लग्नानंतर अंकुरने केतन यांना धमक्या दिल्या होत्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये दिवाळीच्या वेळी चांदुस येथे अंकुरने शुभम तांबेवर गोळीबार केला होता, ज्यात शुभम जखमी झाला होता.
याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. केतन याला अटक झाली होती, पण दोन महिन्यांनी जामिनावर सुटका झाली. यानंतर न्यायालयीन तारखांना येताना केतन याला शुभमकडून धमक्या मिळत होत्या. शुभम आणि केतन पूर्वी मित्र होते, पण वैरामुळे हे घडले, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, अज्ञात आरोपींना ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुभम तांबे आणि त्याचे साथीदार फरार आहेत. खेड परिसरात या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.