

बारामतीः बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. प्रभाग १३ ब आणि प्रभाग १७ अ येथील जागांसाठी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नव्याने नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात आली आहेत. या अर्जांमुळे येथील दोन ठिकाणचे मतदान केव्हा पार पडणार ? याबाबत अनिश्चितता आहे. या दोन जागा वगळून अन्य ठिकाणच्या निवडणूका पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार पार पडतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. संगीता राजापूरकर यांनी दिली.
दरम्यान दोन प्रभागात प्रत्येकी एका जागेसाठी आता तिढा निर्माण झालेला असल्याने निवडणूक निकालाबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यासंबंधी अद्याप निवडणूक निर्णय अधिकााऱ्यांनी माहिती दिलेली नाही. परंतु नगराध्यक्ष पद हे जनतेतून निवडले जाणार असल्याने एकत्रितच मतमोजणी करावी लागेल, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
निवडणूक निर्णय अधिकार्ऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निकालानसुसार प्रभाग क्रमांक १३ ब व प्रभाग १७ अ साठी दि. २६ रोजी नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात आलेली आहेत.
या दोन अर्जांच्या पुढील प्रक्रियेविषयी (छाननी, उमेदवारी मागे घेणे आदी) याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार या दोन जागांचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल. या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.