

मंचर : मंचर नगरपंचायतीची निवडणूक जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी तिची दिशा भावकी, जातीय समीकरणे आणि वैयक्तिक नातेसंबंध याकडे झुकताना दिसत आहे. ‘झालं गेलं विसरा, आता सोबत या’, अशा सुरात उमेदवारांनी संवाद वाढवला असून मतदारांनाही यामुळे वेगळाच भाव मिळू लागला आहे.
राजकीय मुद्द्यांपेक्षा आता कोणाची कुणाशी भावकी आहे, कोण-कोणाच्या संपर्कात आहे आणि कोण-कुणाला भेटून आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहे, यावरच निवडणुकीची वाटचाल ठरताना दिसत आहे. काही उमेदवार जे साधारणपणे लोकांशी कमी बोलतात, तेच आता मतदारांना स्वतःहून भेट देत आदराने विचारपूस करताना दिसत आहेत. अनेक मतदारांशी पूर्वीच काही कारणांनी दुरावा निर्माण झाला असला, तरी आता तो विसरून जाण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले जात आहे.
मतदानाचे दिवस जवळ आल्याने उमेदवारांना प्रत्येक मताचे महत्त्व जाणवू लागले असून त्यांच्या वर्तणुकीत मोठा बदल दिसतो. काही प्रभागांमध्ये भावकीचे राजकारण तीव झाले असून, मतदारांना आपल्या महत्त्वाची जाणीव अधिक ठळकपणे होऊ लागली आहे.
उमेदवारांचा वाढलेला संवाद, भेटीगाठी आणि माफीनाम्यासारख्या विनंतीमुळे मतदारांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. एकूणच, मंचरमध्ये निवडणूक प्रचाराला भावकीची आणि मतदारांच्या महत्त्वाची चांगलीच जोड मिळाली असून, पुढील काही दिवसांत ही स्पर्धा आणखी रंगेल, अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.