

मंचर: राज्यातील साखर कारखान्यांना प्रतिटन ३३५ रुपयांच्या निकषानुसार कर्ज देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सुमारे ३० कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीत पैसे देण्याचा मार्ग मोकळा होईल तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत ऊस गाळपासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांना जादा दर देण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (दि. १२) केली.
दत्तात्रयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याचा २७ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आणि गव्हाणपूजन वळसे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बाबा खेतानाथजी ट्रस्टचे अध्यक्ष महंत योगी कृष्णनाथजी महाराज, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव पवार, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, शेतमाल प्रक्रिया संस्थेचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील, ज्येष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील, शिवाजीराव ढोबळे, कामगारनेते ॲड. बाळासाहेब बाणखेले, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे पाटील, कारखान्याचे संचालक, ऊस उत्पादक शेतकरी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, तालुक्यात ऊस कमी असल्यामुळे बाहेरील ऊसतोडणीला प्राधान्य दिले जाणार आहे. जवळील शेतकऱ्यांचा ऊस उशिरा गाळपासाठी घ्यावा लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कारखान्याने जादा दर देण्याचे धोरण आखले आहे. आंबेगाव तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश व्हावा, यासाठी चर्चा सुरू असून, पुढील आठ ते पंधरा दिवसांत याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी प्रास्ताविकात या हंगामासाठी १० लाख टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले असून, आजूबाजूच्या किंवा उत्तर पुणे जिल्ह्यात कोणीही दिला नाही असा चांगला ३ हजार ५०० रुपये दर भीमाशंकर कारखान्याने दिल्याचे सांगितले. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, विवेक वळसे पाटील, आदिनाथ महाराज जुन्नरकर, संतदास महाराज मनसुख, अश्विनी महाराज टाव्हरे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी आभार मानले.
कालावधीनुसार जाहीर केलेला दर पुढीलप्रमाणे
ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत : एफआरपीनुसार ३,२७३ रुपये
जानेवारी : मूळ दर एफआरपी ३,२७३ रुपये + १०० रुपये जादा दर = एकूण ३,३७३
फेब्रुवारी : मूळ दर एफआरपी ३,२७३ रुपये + २०० रुपये जादा दर = ३,४७३
मार्च : मूळ दर एफआरपी ३,२७३ रुपये + ३०० रुपये जादा दर = ३,५७३ रुपये