

भीमाशंकर: श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील महाशिवरात्री यात्रा यंदा शिवभक्तांशिवाय साजरी करण्यात आली. शिवलिंगावर जलाभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. अनादी काळापासून पहिल्यांदाच महाशिवरात्री यात्रेला खंड पडत असल्याचे भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मधुकर गवांदे यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंदिर परिसरात विकास कामांना सुरुवात झाली आहे. यातून भक्तांच्या सुरक्षेसाठी मंदिर महाशिवरात्रीसाठी असुरक्षित असल्याने दर्शनासाठी खुले करणे शक्य नाही. यामुळे या वेळेस होणारी महाशिवरात्र ही शिवभक्तांशिवाय साजरी झाली आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी महाशिवरात्री यात्रेला पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. महाशिवरात्रीच्या आधी दोन दिवस व नंतर दोन-तीन दिवस श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकरला ‘हर हर महादेव’ या जयघोषांनी दुमदुमून जातो. मात्र, 2027 मध्ये नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून, त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ 2025 च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-र्त्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथील व्यवस्थापन व भक्तांसाठी आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी काही कामे करण्यात येणार आहेत. 2027 ला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधांसाठी तयार करण्यात आलेल्या 288.17 कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
या वेळी प्रशासनाला लोकांनी सहकार्य करावे, भीमाशंकर परिसरात येऊन त्रास देऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही काही जण पोलिसांसोबत वाद घालत भीमाशंकर परिसरात घुसत असल्याचे दिसून येते. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागिय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिलेला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे अनादी काळापासून सुरू असलेली महाशिवरात्र यात्रा चालू वर्षी विकासकामांमुळे बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, परंपरेनुसार रात्री बारा वाजता काही गुरव, पुजारी, बाह्मवृंदांकडून शिवलिंगावर जलाभिषेक करून पूजा केली जात आहे. महाशिवरात्र यात्रा बंद असल्याने भाविकांनी भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाला सहकार्य करावे
सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट