

पुणे: महाशिवरात्री आणि उन्हाचा वाढलेला चटका यामुळे बाजारात कलिंगड, खरबूजसह पपईला मागणी वाढली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने त्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, उन्हाचा चटका वाढल्याने द्राक्षांच्या गोडीसह आवकही वाढली आहे. परिणामी, त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक जावक कायम असून दर टिकून असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.
राज्यातील डाळिंबाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. रविवारी सांगोला भागातून नवीन हंगामातील डाळींबाची आवक झाली. बाजारात राज्यासह परराज्यातील कर्नाटक तसेच गुजरात येथूनही डाळिंबाची आवक होत आहे.
राज्यातील डाळींबाची बांधावरून खरेदी वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमीच आहे. त्यामुळे, डाळिंबाचे चढे दर कायम आहेत. याखेरीज, आंबट-गोड बोरांचा हंगाम संपल्याने त्याची आवकही रोडावल्याचे दिसून आले.
फळबाजारात रविवारी (दि. 15) मोसंबीची 50 ते 60 टन, संत्रा 30 ते 40 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची सुमारे 1 हजार 200 ते 1 हजार 500 गोणी, कलिंगड 15 ते 16 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, चिक्कू 2 हजार गोणी, पेरु 100 ते 150 क्रेट, अननस 6 ट्रक, स्ट्रॉबेरी 5 ते 6 टन, द्राक्षे 12 ते 15 टन आणि बोरांची 125 ते 150 पोती इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे:
लिंबे (प्रतिगोणी) : 300-800, मोसंबी : (3 डझन) : 100-600, (4 डझन) : 50-350, संत्रा : (10 किलो) : 250-900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 80-300, आरक्ता : 20-80, गणेश : 10-50, कलिंगड : 15-30, खरबूज : 15-35, पपई : 12-25, चिक्कू (दहा किलो) : 100-600, पेरु (20 किलो) : 600-700, अननस (1 डझन): 100-600, बोरे (10 किलो) : चमेली 500-550, चेकनट 1200, उमराण 180-200, चण्यामण्या : 1000-1100. द्राक्षे (10 किलो) : जम्बो 800-1200, सुपर सोनाका 700-1000, सोनाका 650-900, स्ट्रॉबेरी (2 किलो) 100-300.