

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रात माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी करणे गरजेचे आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळा तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक, शिक्षक पदभरतीसाठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते.
ही परीक्षा याच वर्षात 27 मे ते 30 मे व 2 जून ते 5 जून या कालावधीत घेण्यात आली होती. या चाचणीसाठी 2 लाख 28 हजार 808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 9 हजार 101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे.
त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षणसेवक, शिक्षक या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे, त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाण पत्र तयार करणे बंधनकारक असणार आहे. पवित्र पोर्टलवरील नोंदणी व स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज मराठी आणि इंग््राजीत उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी व स्व-प्रमाणपत्रासाठी आवश्यक माहिती इंग््राजीत भरावी.
संक्षिप्त अथवा आद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादींमध्ये एक स्पेस सोडावी, असे आवाहन केले आहे.