

पुणे: मावळ तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाविरोधात पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (दि. 18) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीचे आयोजन केले असून, त्यात याबाबत चर्चा केली जाणार आहे.
या बैठकीस राज्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, तोडगा न निघाल्यास राज्यव्यापी आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 ग््रााम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तालुका व गावपातळीवरील महसूल कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. अडीच हजार अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत.
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबत शुक्रवारपर्यंत (दि. 19) निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य अधिकारी-कर्मचारी महासंघाने राज्य सरकारला दिला आहे. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील महसूल कार्यालयांमध्ये तिसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन सुरू राहिल्याने नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.