

भरत मल्लाव
भिगवण: अंगात अंमल दारू आणि गांजाचा; पण खापर मात्र भुतावर फोडले जात आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरातील गावात मुलांना भुताने झापटल्याचा व गावाला भुताटकीचा फेरा लागल्याच्या अफेवेने सामान्यांचा मात्र थरथराट झाला आहे.
आठवड्यात दोनदा घडलेल्या हा प्रकार म्हणजे निव्वळ अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा ठरला आहे. या दोन्ही घटनांना डॉक्टरांनी दारू व गांजाची किक असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने या प्रकाराला भुताटकीचा फेरा व मुलांना झपाटल्याचा गवगवा गावभर झाला आहे. भुताचा मेळा हा या भागातील वन विभागाची जागा ठरली आहे.
याची थोडक्यात माहिती अशी की, गेल्या आठवड्यात काही मित्र या भागातील वन विभागाच्या हद्दीत पार्टीला गेले व मटणावर ताव मारण्याचा बेत ठरला. यामध्ये मग मदिराची एंट्री झाली आणि त्यातून कोणा एकाच्या अंगात भूत शिरले आणि मग मटण तावातावाने आणि ओरबाडून खाण्यास सुरुवात केली. त्यातून झिंगलेल्या या मित्रात आपल्या एका मित्राला लागीर झाल्याचा आणि त्याला झपाटल्यानेच त्याच्यात हा बदल झाल्याची भीती निर्माण करून घेतली. त्यातही त्याने आपल्यापेक्षा ताकदवान मित्रांना लोळवण्यास सुरुवात केली आणि मग मात्र आपल्या मित्राला लागीरच झाल्याचा विश्वास मित्रांना झाला आणि मग त्याला एका मंदिरात नेऊन भूत उरविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर मंगळवारी (दि. 10) पुन्हा अफवेचे भूत प्रकटले आणि सख्ख्या चुलत भावाने भावला चावा घेतल्याची चर्चा पसरली. यामध्ये एक युवक झिंगलेल्या अवस्थेत व चित्रपटाला साजेल अशा आवाजात गुरगुरत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला आहे व सख्ख्या चुलत भावाचा चावा घेतल्याचे यात दिसत आहे. हा प्रकारही लागीर झाल्याच्या अफवा पसरवून गेला. या दोन्ही घटनांमुळे हा प्रकार लागीर झाल्याच्या अफेवेने दणाणून गेला आहे. अर्थात, अनेकांनी याची धास्ती देखील घेतली आहे.
हा निव्वळ अंधश्रद्धेचा प्रकार आहे. गांजा व दारूचा एकत्रित अंमल चढतो आणि मेंदूवरील नियंत्रण सुटत असल्याने विचित्र वागतात. त्यांचा स्वतःवर ताबा राहत नाही, त्यांना मारून, ओरडून काही होत नाही. जोपर्यंत अंमल विड्रॉल होत नाही तोवर त्यांच्यात बदल होत नाही. या नशेतून बाहेर पडण्यास किमान दोन दिवसांचा अवधी लागतो.
डॉ. संजय भोसले, प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ, भिगवण