

पुणे: गॅसटंचाईमुळे पुणे महापालिका हद्दीतील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, संबंधित गॅस कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने उपलब्धतेनुसार शहरातील गॅस दाहिन्या सुरूच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसपुरवठ्यातील तात्पुरत्या अडचणीमुळे काही दिवस गॅस दाहिन्यांच्या कार्यप्रणालीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. शहरातील अनेक स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारांसाठी गॅस दाहिन्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने या सेवा बंद झाल्यास गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून विविध स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिन्या तसेच एपीसी प्रणालीवर आधारित यंत्रणा कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली होती.
दरम्यान, गॅसपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी महापालिकेने संबंधित गॅस कंपन्यांशी संपर्क साधला. यासंदर्भात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला पत्र पाठविले असून, सध्या महापालिकेला 47.5 किलो वजनाचे दहा गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले आहेत. या उपलब्धतेनुसार शहरातील गॅस दाहिन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गॅसपुरवठ्यात तात्पुरती अडचण निर्माण झाल्याने काही काळ दाहिन्या बंद ठेवण्याचा विचार झाला होता. मात्र, सिलिंडरचा पुरवठा सुरू झाल्याने परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसांत गॅसपुरवठा नियमित राहिल्यास गॅस दाहिन्यांचे कामकाज सुरळीत सुरू राहील, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील दाहिन्यांची स्थिती
पुणे शहरात सध्या एकूण 20 गॅस दाहिन्या कार्यरत आहेत. याशिवाय 10 विद्युत दाहिन्या उपलब्ध आहेत. दररोज सरासरी 20 मृतदेहांवर गॅस दाहिन्यांद्वारे अंत्यसंस्कार केले जातात, तर सुमारे 35 मृतदेहांवर विद्युत दाहिन्यांद्वारे अंत्यसंस्कार होतात. तसेच 20 ते 25 मृतदेहांवर पारंपरिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार केले जातात.