

आशिष देशमुख
पुणे: भारत ज्ञान मंडपम या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत पुण्यातील भांडारकर संस्थेवर मुख्य जबाबदारी टाकण्यात आली असून, देशभरातील पुरातन हस्तलिखितांसह पोथ्यांचे डिजिटायझेशन एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू झाले आहे. या योजनेसाठी तब्बल ४१० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भांडारकर संस्थेवर देशाच्या पश्चिम भागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या संस्कृतिक मंत्रालयाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश भारतातील जुनी हस्त लिखिते, ऐतिहासिक दस्तऐवज आणि ज्ञानपरंपरेशी संबंधित साहित्य शोधणे, नोंदणी करणे, जतन करणे, डिजिटल स्वरूपात आणणे, संशोधनासाठी उपलब्ध करून देणे आणि प्रकाशित करणे हा आहे. मिशनसाठी २०२५ ते २०२३१ या कालावधीसाठी ४९१.४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मिशनची पाच प्रमुख क्षेत्रे
सर्वेक्षण, सूचिकरण, संवर्धन, क्षमता विकास, तंत्रज्ञान, डिजिटायझेशन, भाषाशास्त्र, भाषांतर, संशोधन, प्रकाशन आणि प्रसार अशी पाच क्षेत्र तयार केली आहे. भांडारकर संस्थेच्या वतीने पश्चिम भागातील पुरातन दस्तऐवज नोंदवून घेण्याचे काम सुरू झाले आहे.
पुण्यातील आणखी दोन संस्था सहभागी...
महाराष्ट्रातील एकूण चार संस्था भांडारकर संस्थेच्या सोबत काम करणार आहेत. यात पुण्यातील आनंद आश्रम आणि भारत इतिहास संशोधक मंडळ तसेच कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, नागपूर यांचा समावेश आहे.
भांडारकर संस्थेची भूमिका काय?
संस्थेकडे सुमारे २९ हजार ५१० हस्तलिखिते असल्याचे संस्थेच्या अधिकृत माहितीत नमूद आहे. त्यात संस्कृत, मराठी, अरबी, फारसी, उर्दू आदी भाषांतील आणि देवनागरी, शारदा, ग्रंथ, नस्तालीक, कन्नड, तेलुगू, तमिळ आदी लिप्यांतील हस्तलिखितांचा समावेश आहे.
सुमारे३५० ताडपत्र आणि १५० भूर्जपत्र हस्तलिखितेही आहेत. फार पूर्वीपासूनच भांडारकर हस्तलिखितांच्या संवर्धनावर काम करीत असल्यामुळे देशाच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली.
भांडारकर संस्था केवळ स्वतःची हस्तलिखिते डिजिटल करणार नाही, तर मुख्य क्लस्टर सेंटर म्हणून महाराष्ट्रातील इतर संग्रह, संस्था आणि हस्तलिखितधारकांना जोडण्याचे काम करीत आहे.
या मिशनची प्रमुख जबाबदारी आमच्याकडे आहे. आमच्या भांडारकर संस्थेतील डॉ. श्रीनंद बापट आणि विणा राज हे देखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. एकूण ९ जणांची टीम आहे. ज्यांनी राज्यभरातील पुरातन पोथ्या हस्तलिखितांची माहिती घेऊन तेथे प्रत्यक्ष भेटी देण्याचे काम सुरू केले आहे.हा प्रकल्प खूप मोठा असून, दोन वर्षांनी त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
मनोज एरंडे, प्रमुख ज्ञान भारतम योजना, पश्चिम विभाग