काळजी घ्या…व्हायरल इन्फेक्शनचे वाढले रुग्ण

काळजी घ्या…व्हायरल इन्फेक्शनचे वाढले रुग्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दुसरीतील शार्दुल जगताप शाळेतून घरी आला तो ताप, सर्दी, डोकेदुखीने बेजार होऊनच. आई-बाबांनी संध्याकाळी त्याला डॉक्टरांकडे नेऊन आणले. दुसर्‍या दिवशी आईलाही अंगदुखी, थकवा जाणवू लागला. दोनच दिवसांत बाबाही तापाने फणफणले आणि अख्खा आठवडा आजारपणातच गेला. सध्या शहरात बहुतांश घरांमध्ये हेच चित्र पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे एकाच वेळी संपूर्ण कुटुंब आजारी पडत असल्याचे निरीक्षण शहरातील डॉक्टरांनी नोंदवले आहे.

पावसाळ्यात विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. एकीकडे एंटेरो विषाणूमुळे लहान मुलांमध्ये 'आय फ्लू'ची साथ वेगाने पसरत आहे. त्याच वेळी इन्फ्लूएंझा विषाणूही प्रबळ झाल्याने व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छोटे दवाखाने, रुग्णालयांमध्ये एरव्हीपेक्षा रुग्णांची गर्दी वाढली आहे. शिवणे येथील जनरल फिजिशियन डॉ. रोहित औटी सांगतात, 'दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 5 ते 10 या कालावधीत साधारणपणे 40-50 रुग्ण औषधोपचारांसाठी येतात. गेल्या काही दिवसांमध्ये डोळ्यांचा संसर्ग तसेच व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, पोटदुखी, सर्दी किंवा खोकला ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत.'

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरवर्षी व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. सर्वच वयोगटांतील लोक अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप अशा त्रासाने हैराण होतात. कुटुंबात एकाला संसर्ग झाला की तो इतर सदस्यांनाही होतो. यातून पूर्ण बरे होण्यासाठी तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागू शकतो. सौम्य लक्षणे असल्यास अँटिबायोटिक औषधे देण्याची गरज नसते. सौम्य औषधोपचारांनीही बरे वाटू शकते. या कालावधीत विश्रांती, आहार महत्त्वाचा असतो.

– डॉ. श्रीराम जोशी, अध्यक्ष,
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news