रायगड: भावाला वाचविताना लहान भावाचा कुंडात बुडून मृत्यू | पुढारी

रायगड: भावाला वाचविताना लहान भावाचा कुंडात बुडून मृत्यू

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड शहरानजीकच्या काळीज ग्रामपंचायत हद्दीतील नवीन वसाहतीमध्ये राहणाऱ्या अठरा वर्षीय स्मित राजेंद्र घाडगे या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.७) दुपारी शिवाजी वाळण उत्तेकरवाडी परिसरात डोंगरावर असलेल्या घागर कुंडमध्ये घडली.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी स्मित घाडगे आपला भाऊ व मित्रांसह शिवाजी वाळण या गावापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगर माथ्यावरील घागर कुंडमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी स्मित याचा मोठा भाऊ यश घाडगे हा पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी स्मित याने पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

पोलीस, स्थानिक ग्रामस्थ व महाड येथील एनडीआरएफच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बिरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. स्मित घाडगे हा महाडच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. काळीज गावामध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

हेही वाचा 

Back to top button