पुणे मेट्रो स्थानकावर हरवलेला मुलगा 20 मिनिटांत सापडला

पुणे मेट्रो स्थानकावर हरवलेला मुलगा 20 मिनिटांत सापडला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेट्रोने प्रवास करण्यासाठी जात असलेल्या एका कुटुंबीयांचा चिमुकला मुलगा हरवल्याची घटना सोमवारी घडली. मेट्रोच्या कोथरूड परिसरातील आयडियल कॉलनी स्थानकावर एकच हाहाकार उडाला. मुलगा हरवल्याने मुलाच्या पालकांना अक्षरश: रडू कोसळले. मात्र, मेट्रोच्या कर्मचार्‍यांनी अवघ्या वीस मिनिटांतच या मुलाचा शोध घेऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केले.

एक दाम्पत्य सायंकाळच्या सुमारास आपल्या मुलाला घेऊन मेट्रोने प्रवास करण्यासाठी सोमवारी आयडियल कॉलनी मेट्रो स्थानकावर आले होते. स्थानकावर आल्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर गेल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले आणि त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांना काय करावे सूचेनासे झाले. इतक्यात स्थानकावर असलेला नियंत्रण कक्ष मुलाच्या पालकांना दिसला.

मुलाच्या आई-वडिलांनी या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मुलगा हरवल्याची माहिती दिली. माहिती मिळताच मेट्रोच्या नियंत्रण कक्षाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी स्थानकावरील सर्व कर्मचार्‍यांना मुलाचा शोध घेण्यास पाठवले आणि नियंत्रण कक्षातून मुलाच्या लोकेशनद्वारे त्याचा शोध घेण्यात आला. अवघ्या 20 मिनिटांत मुलगा नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आला. कर्मचार्‍यांनी या मुलाला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. मुलगा मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर मुलाच्या पालकांनी मेट्रो कर्मचारी आणि मेट्रो प्रशासनाचे आभार मानले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news