

Prakash Ambedkar and Anandraj Ambedkar : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू असताना, आता आंबेडकर बंधू एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर या चर्चेला अधिकच जोर आला असून, यावर आनंदराज आंबेडकर यांनी महत्त्वाचे आणि सूचक वक्तव्य केले आहे.
आंबेडकरी चळवळ अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी भविष्यात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य आनंदराज आंबेडकर यांनी केलं. “प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. जसं ठाकरे बंधू एकत्र आले, तसं भविष्यात आम्हीही येऊ शकतो,” असे संकेत त्यांनी दिले आहेत.
सध्या आनंदराज आंबेडकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीत आहेत. मात्र या युतीत अपेक्षित जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही काही महत्त्वाच्या जागा मागितल्या होत्या, पण त्या आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. तरीही युतीचा धर्म पाळत आम्ही काम करू,” असे ते म्हणाले.
आंबेडकरी चळवळीच्या भवितव्याबाबत बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, “आम्ही दोघेही (मी आणि प्रकाश आंबेडकर) आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आमच्यात काही तात्विक मतभेद आहेत. तरीसुद्धा, जर आंबेडकरी चळवळ मजबूत करायची असेल, तर आपली माणसं सत्तेत बसणं गरजेचं आहे. प्रयत्न झाला, तर माझ्याकडून सकारात्मक प्रतिसाद नक्कीच असेल.”
महायुतीतील अंतर्गत विसंवादावरही त्यांनी थेट भाष्य केले. “आयत्यावेळी अनेकांनी युती तोडल्या. युतीचा धर्म कोणीच पाळलेला नाही. मोठे पक्ष ‘आम्ही म्हणू तेच होणार’ या भूमिकेत आहेत. शेवटच्या क्षणी कोण कुणाला मदत करतोय, हे स्पष्ट होईल आणि त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, सत्तेत सहभागी असलेल्या आंबेडकरी नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी रामदास आठवले यांचे नाव न घेता टोला लगावला. “आंबेडकरी चळवळ एकत्र यावी, ही आमची भूमिका आहे. मात्र फक्त सत्तेत बसून गप्पा मारून चालणार नाहीत,” असे ते म्हणाले. आगामी निवडणुकांत आंबेडकरी राजकारण कोणत्या दिशेने जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.