

बारामती: बारामती तालुक्यातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना 7 फेबुवारी रोजी सायंकाळी आणि 11 जानेवारी रोजी दुपारी घडल्या होत्या. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी श्रीकांत अशोकराव बिरादार (वय 33, रा. सूर्यनगरी, बारामती) हे महावितरण शाखा सणसर येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. 7 फेबुवारी रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाऊन सायंकाळी घरी परतल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या पत्नी प्रज्ञा यांनी कपाटातील दागिने ठेवलेला कप्पा उघडा असल्याचे पाहिले. कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त असून, सोने-चांदीचे दागिने तसेच अंदाजे 10 हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले.
पत्नी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत मुलाला खेळवण्यासाठी खाली रस्त्यावर घेऊन गेल्या असताना घराचा दरवाजा पुढे लावलेला होता. याच वेळेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली आली. यामध्ये मिनी गंठण (17.5 ग््रॉम - 50 हजार), काप (8 ग््रॉम - 20 हजार), इअरिंग (4 ग््रॉम - 10 हजार), दोन अंगठ्या (6 ग््रॉम - 10 रुपये), चांदीचे पैंजण, रोख 10 रुपये असा एकूण अंदाजे किंमत 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
सुरेंद्र वामनराव चव्हाण (वय 48, रा. सुमन रेसिडेन्सी, फ्लॅट नं. 3, सूर्यनगरी, बारामती) यांच्याही घरी अशाच घटना होऊन 35 हजार रुपये रोख रक्कम चोरी झाली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी तांदूळवाडी (ता. बारामती) येथून ऋषिकेश विजय कोकाटे (वय 21, रा.अंबिकानगर, इंदापूर) याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली देत चोरीतील सोन्याचे दागिने सोनार श्रेयस विठ्ठल कुलथे (वय 25, रा. व्यंकटेशनगर, इंदापूर) याच्याकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सोनार कोलते यालाही अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अंमलदार केदारनाथ बिडवे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार, जितेंद्र शिंदे, राहुल मखरे, सुरेश लांडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे स्वप्निल अहिवळे, अभिजित एकशिंगे यांनी केली आहे.