

काटेवाडी : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत बारामती तालुक्यात रेशीम उद्योगाला मोठी चालना मिळाली आहे. तालुक्यातील 241 शेतकऱ्यांनी तुतीलागवड आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगात सहभाग नोंदवला आहे. यातील 168 शेतकरी लाभार्थींचे प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले आहे.
तालुक्यात सध्या 250 एकर क्षेत्रावर तुतीलागवड करण्यात आली आहे. या लागवडीपासून तयार होणाऱ्या रेशीम कोषाला 735 रुपये प्रतिकिलो असा चांगला बाजारभाव मिळत आहे. रेशीम उद्योगात एकदाच केलेला खर्च 15 ते 20 वर्षे उत्पादन देणारे साधन ठरत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय हमखास उत्पन्नाचा स्रोत बनत आहे.
योजनेतंर्गत प्रतिलाभार्थीस कुशल व अकुशल कामांच्या स्वरूपात 4 लाख 32 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे अल्पभूधारक व मध्यम शेतकऱ्यांना रेशीम उद्योगात प्रवेश करणे सुलभ झाले आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांसह कुटुंबीयांनाही बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे.
शेतीमालाला हमीभाव न मिळणे, पारंपरिक शेतीतून होणारे तोकडे उत्पन्न आणि अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान लक्षात घेता अनेक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वाटचाल केली आहे.
पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. रेशीम उद्योग सुरू केल्यानंतर नियमित व चांगले उत्पन्न मिळू लागले असून, कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत झाला आहे, असे काटेवाडी येथील शेतकरी याकुब पठाण व प्रवीण कदम यांनी सांगितले.
बारामती तालुक्यात रेशीम शेतीचा विस्तार करण्यासाठी पुढील काळात खासगी स्तरावर तुती नर्सरीधारक, चॉकी सेंटरधारक, ऑटोमॅटिक रीलिंग मशिनधारक, ट्विस्टर, विणकर व व्यापारी यांचे व्यापक जाळे उभारण्याचे नियोजन आहे. उत्पादन, प्रक्रिया व विक्री या सर्व टप्प्यांवर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल.
संजय फुले, रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय