

पुणे : माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देशस्तरावर आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय कला उत्सव यंदा 20 ते 23 डिसेंबरदरम्यान पुण्यात रंगणार असून देशभरातून 918 विद्यार्थी, 108 शिक्षक आणि 36 परीक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय कला उत्सव हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एनसीईआरटी, नवी दिल्लीद्वारे या उत्सवाचे 2015 पासून दरवर्षी आयोजन केले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक असलेली एक प्रमुख क्षमता म्हणून कलेकडे पाहिले जाते. कला हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम असल्याचे या धोरणात नमूद असून, याच संकल्पनेचा सर्वांगीण समावेश राष्ट्रीय कला उत्सवामध्ये केला आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अपेक्षित असलेला प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
यंदाचा अकरावा राष्ट्रीय कला उत्सव 2025 हा विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सर्जनशील, अभिव्यक्तिपूर्ण आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये देशभरातून 405 मुले आणि 513 मुली असे एकूण 918 विद्यार्थी, 108 शिक्षक आणि 36 परीक्षक यांचा सहभाग असणार आहे. या कला उत्सवामध्ये गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपारिक कथाकथन इत्यादी 12 कला प्रकारांचा समावेश असून त्यांचे सादरीकरण होणार आहे.
यंदाचा हा कला उत्सव 20 ते 23 डिसेंबर 2025 दरम्यान यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे संपन्न होणार आहे. राष्ट्रीय कला उत्सव 2025 चे उद्घाटन शनिवार, 20 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, 22 डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धा यादरम्यान पार पडतील. 23 डिसेंबर 2025 रोजी समारोप व बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला आहे.