

खडकवासला : 1957 मध्ये बांधलेल्या पानशेत धरणात बुडालेल्या शिरकोली (ता. राजगड) येथील शिवकालीन श्री शिरकाईदेवी मंदिर व परिसरातील ऐतिहासिक स्थळे, देवराईचे जतन करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व भाविकांनी केली आहे.
याबाबत पुरातत्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ, शिरकाई देवस्थानचे विश्वस्त नामदेव पडवळ व भाविकांनी निवेदन दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजामाता यांनी 1652 च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवीच्या सण उत्सवासाठी कायम इनाम जमीन दिली. तसेच देवीला अलंकार अर्पण केले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई व त्यानंतर संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीच्या सण-उत्सवासाठी दिलेल्या इनाम जमिनीची शासनाने नुकतीच नवीन सातबारा उताऱ्यावर नोंद केली आहे. धरण बांधण्यापूर्वी शिवकालीन मंदिर व शेकडो वर्षांपासून विविध ऐतिहासिक वास्तू, स्थळे होती. चिरेबंदी दगडांची प्रवेश कमान, सभामंडप, वेस होती. मंदिर पाण्याखाली गेल्याने देवीची मूर्ती बाहेर काढण्यात आली. धरणतीरावर मंदिर बांधून ग्रामस्थांनी तेथे मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर शासनाने मंदिर बांधले. या मंदिरात देवीचे सण-उत्सव साजरे केले जात आहेत.
धरणात बुडालेले शिवकालीन मंदिर अद्याप भक्कम स्थितीत आहे. दगड, चुन्यात बांधलेल्या मंदिरांचा गाभारा, कळस अत्यंत सुबक, रेखीव आहे. गाभाऱ्यातील दगडी छतावर फुलांचे सुंदर नक्षीकाम केले आहे. असे असले तरी मंदिराची वेस, प्रवेश कमान जवळपास जमीनदोस्त झाली आहे. परिसरातील ऐतिहासिक वास्तुस्थळेही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
धरणातील पाणी खाली गेल्यानंतर मंदिर पाण्याबाहेर येते. मंदिर पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी हजारो भाविक, पर्यटक येतात. छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यासाठी तोलामोलाची साथ देणाऱ्या मावळ्यांची स्फूर्ती दैवत म्हणून देवस्थानची शिवकाळापासून ओळख आहे.