

पुणे: विमान पडलंय... पळा पळा... अशा किंकाळ्या, आगीचे आभाळाला भिडलेले लोळ आणि चोहोबाजूंनी सुटलेला सुसाट वारा. बारामतीतील गोजुबावी गावातील आटोळेवस्तीवर आजची सकाळ नियतीने घातलेला घाला घेऊनच उजाडली. विमानात नेमकी कोणती मोठी व्यक्ती आहे, याची पुसटशी कल्पनाही नसताना फक्त ‘माणुसकी’ या नात्यापोटी स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आगीच्या लोळांत झोकून दिले.
बारामतीकरांनी बुधवारी (दि. 28) आपल्या लाडक्या नेत्याला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले, ते पाहून राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे असलेले ‘माणुसकीचे नाते’ पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. या अपघाताच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
त्यात दादा असतील असं वाटलं नव्हतं नेहमीप्रमाणे सकाळी सव्वाआठच्या सुमारास किरण गुजर हे गावात दूध घालायला आले होते. दूध घालून परतत असतानाच त्यांच्या डोळ्यांदेखत काळाने घाला घातला. विमान पडले आणि क्षणात त्याने पेट घेतला. आगीचे लोळ एवढे भयानक होते की जवळ जाणे कठीण होते. पण, आत माणसे अडकली आहेत हे पाहून आमचा थरकाप उडाला. भावकीतल्या पोरांना बोलावले. घरातून पाण्याच्या बादल्या आणि चादरी आणून आग विझवायला सुरुवात केली. विमानात अजितदादा असतील हे आम्हाला ठाऊक नव्हतं, आम्ही फक्त माणसांना वाचवण्यासाठी धडपडत होतो, अशा शब्दांत किरण गुजर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
...अन् होत्याचं नव्हतं झालं!
घराबाहेर सकाळची कामे आटोपत असताना निकीता आटोळे यांनी तो भीषण प्रसंग जवळून अनुभवला. निकीता सांगतात, विमानाचा आवाज खूप मोठा येत होता. रनवेवर लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला आणि विमान पुन्हा फिरून आले. दुसऱ्यांदा उतरताना मात्र ते रनवेऐवजी शेजारच्या खोल जागेत कोसळलं.
मदतीसाठी सरसावलेले हात आणि ओलावलेले डोळे
स्थानिक नागरिक नीलेश देवकाते यांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा संपूर्ण गाव तिथे एकवटले होते. प्रशासकीय यंत्रणा येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी मदतकार्याला सुरुवात केली होती. आम्ही पोहचलो तेव्हा सगळीकडे धूर होता. प्रशासकीय मदतीसोबत आम्हीही विमानाच्या ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढायला मदत केली. हे दृश्य खूपच भयानक होत, असे नीलेश यांनी सांगितले.