

बारामती: तीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. 13) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 6,781 प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. विविध विभागांकडील एकूण 7 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम वसूल झाली.
बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलप्रमुख म्हणून न्या. एच. ए. वाणी, न्या. एस. टी. चिकणे, न्या. एस. आर. मोकाशी, न्या. ओ. एस. माळी, न्या. डी. पी. पुजारी, न्या. एम. पी. मराठे यांनी काम पाहिले. बारामती वकील संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच बारामती न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी याकामी मोठे सहकार्य केले.
लोकअदालतीत विविध विभागांकडील एकूण 15,412 प्रकरणे ठेवली गेली होती. त्यातील 6,781 प्रकरणांमध्ये सामंजस्य घडविण्यात यश आले. लोकअदालतीच्या माध्यमातून नागरिकांना कमी वेळेत आणि विनाखर्च न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
बँकवसुलीची 4,779 प्रकरणे दाखल झाली होती. यामधील 64 प्रकरणांचा निपटारा होऊन 1 कोटी 93 लाख 33 हजार 935 रुपयांची वसुली करण्यात आली. विद्युत बिल (अविवादित) प्रकरणांतील 743 पैकी 8 प्रकरणे निकाली निघून 5 लाख 97 हजार 820 रुपयांची सामंजस्य वसुली झाली.
मोटार अपघात दावा प्रकरणांमध्ये 16 प्रकरणांचा निपटारा होऊन 3 कोटी 78 लाख 20 हजार 44 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. इतर दिवाणी प्रकरणांतून 20 लाख 20 हजार 894 रुपये, तर फौजदारी (समेटयोग्य) प्रकरणांत 4 प्रकरणे निकाली निघाली. घरपट्टीमध्ये 3,751 प्रकरणे निकाली निघाली. यामध्ये 1 कोटी 60 लाख 13 हजार 344 रुपयांची वसुली झाली. पाणीपट्टीची 2,869 प्रकरणे निकाली निघाली, यामध्ये 23 लाख 65 हजार 1036 रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतीमुळे न्यायालयांवरील ताण कमी होण्यास मदत झाली.