

खेड: राजगुरुनगर शहरात सोमवारी (दि. 15) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याची त्याच्या वर्गमित्रानेच खासगी शिकवणी क्लासमध्ये वार करून हत्या केली. या भयंकर घटनेच्या पार्श्वभूमीवर खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. मंगळवारी (दि. 16) शहरातील एकूण 18 खासगी शिकवणी क्लासेसची विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीची माहिती गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शिक्षण विभागाने ही मोहीम राबवली. शहरातील गजबजलेल्या भागात असलेल्या या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी विविध बाबींची कडक तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये अग्निशमन यंत्रणा, स्वतंत्र आणि स्वच्छ स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्यार्थ्यांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्था, संगणक यंत्रणा, शिकवणी क्लासमध्ये शिकविणारे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रे, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली, पालकांची संमतीपत्रके यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांची पडताळणी करण्यात आली.
गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी दिवसभरात शहरातील विविध ठिकाणी असलेल्या खासगी क्लासेसवर धाड टाकली आणि तातडीने तपासणी पूर्ण केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. या घटनेने आम्हाला अधिक सतर्क केले आहे, असे जंगले यांनी सांगितले. तपासणीदरम्यान काही क्लासेसमध्ये चांगल्या सुविधा आढळून आल्या, जसे की आधुनिक अग्निशमन यंत्रणा आणि सीसीटीव्ही प्रणाली. मात्र, बहुतेक ठिकाणी गंभीर त्रुटी दिसून आल्या. उदाहरणार्थ, अनेक क्लासेसमध्ये संगणक व्यवस्था नव्हती, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नव्हते, स्वच्छतागृहे अस्वच्छ किंवा अपुरी होती, अग्निशमन यंत्रणा अपडेटेड नव्हती, पालक समितीची पत्रके आणि उपस्थिती नोंदी अपूर्ण होत्या, तसेच कर्मचाऱ्यांची चारित्र्य प्रमाणपत्रेही उपलब्ध नव्हती.
पथकप्रमुख वामन सूर्यवंशी आणि संजय राळे यांनी या त्रुटींवर प्रकाश टाकला. ‘विद्यार्थी सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी आहे. या बाबींची पूर्तता न झाल्यास क्लासेसला धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही क्लास संचालकांना या त्रुटी दूर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत आणि पुढील कारवाईसाठी अहवाल तयार करत आहोत,‘ असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. राळे यांनीही यावर भर देत सांगितले की, ‘पालकांच्या संमतीशिवाय आणि योग्य चारित्र्य प्रमाणपत्रांशिवाय क्लास चालवणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे. आम्ही याची कडक अंमलबजावणी करू.‘
या पथकांमध्ये खेड पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक यांचा समावेश होता. त्यांनी क्लास संचालकांशी चर्चा करून त्यांना आवश्यक सुधारणांसाठी मार्गदर्शन केले. शहरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या तपासणीमुळे समाधान व्यक्त होत आहे. एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘अशी घटना घडल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलली, हे चांगले आहे. आता क्लासेसनीही जबाबदारीने वागावे.
संपूर्ण खेड तालुक्यात होणार तपासणी
शिक्षण विभागाने या तपासणीचा अहवाल तयार करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या क्लासेसमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, त्यांना नोटिसा देण्यात येणार असून, आवश्यक सुधारणा न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. ही मोहीम केवळ राजगुरुनगरपुरती मर्यादित नसून, संपूर्ण खेड तालुक्यातील खासगी शिकवणी क्लासेसची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.