

खोर: ग््राामीण व शहरी भागात विवाहाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. एकीकडे प्रेमविवाहाचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे पारंपरिक ठरवून होणाऱ्या विवाहांमध्ये अपेक्षांचा डोलारा वाढताना दिसत आहे. विशेषतः ग््राामीण भागात शेतकरी तरुणांना विवाहासाठी नकार मिळत असल्याचे वास्तव समोर येत आहे. ‘शेतकरी नवरा नको गं बाई; पण शेती मात्र हवीच..!’ अशी विसंगत मानसिकता अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
पूर्वी शेती, कष्ट आणि स्वाभिमान, यांना मोठे महत्त्व होते. शेतकरी मुलगा म्हणजे कुटुंबाचा आधार, मेहनतीचे प्रतीक मानले जात होते. मात्र, बदलत्या काळात नोकरी, स्थिर उत्पन्न, शहरातील जीवनशैली आणि आर्थिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले जाऊ लागले आहे. याचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी कुटुंबांतील तरुणांना योग्य स्थळ मिळणे कठीण होत चालले आहे.
काही ठिकाणी विवाहाचा संपूर्ण खर्च मुलीकडील पालक करण्यास तयार असतानाही मुलगा शेती करणारा असल्यास स्थळ नाकारले जाते. मुलीला शेतीत राबवायचे नाही, नोकरी करणारा जावई हवा, शहरात घर हवे, अशा जाचक अटींमुळे अनेक शेतकरी तरुण विवाहापासून दूर राहत आहेत. विरोधाभास म्हणजे अनेकांना उत्पन्नाचे साधन म्हणून शेतजमीन आणि शेती हवी असते; मात्र स्वतः शेती करणारा नवरा नको, अशी भूमिका घेतली जाते. शेती ही केवळ व्यवसाय नसून ती एक जीवनपद्धती आहे, हेच विसरले जात आहे.
विवाह जुळवणाऱ्यांसमोरील वाढती अडचण
विवाह जुळवणारे मध्यस्थ, समाजातील ज्येष्ठ नागरिक सांगतात की, शेतकरी तरुणांना स्थळ शोधताना पूर्वीपेक्षा दुपटीने अडचणी येत आहेत. काही तरुण शेती सोडून शहराकडे वळत आहेत, तर काही जणांनी लग्नाचाच विचार बाजूला ठेवला आहे.
समाजाला आत्मपरीक्षण करण्याची गरज
शेती हा देशाचा कणा आहे. शेतकरी दुर्लक्षित होत असतील तर भविष्यात अन्नसुरक्षा आणि ग््राामीण अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे समाजाने, पालकांनी आणि तरुण पिढीने शेतीकडे सन्मानाने पाहण्याची गरज आहे. नवरा कोणत्या पेशात आहे, यापेक्षा तो मेहनती, प्रामाणिक आणि जबाबदार आहे का, याचा विचार व्हायला हवा. अन्यथा ’शेती हवी; पण शेतकरी नको’ ही मानसिकता ग््राामीण समाजासाठी घातक ठरू शकते, हे तितकेच कटू सत्य आहे.