

पुणे : भंगार दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरी करण्याच्या हेतूने आलेल्या तिघांना पकडून, स्टील आणि पिव्हीसी पाइपाने बेदम मारहाण केली. मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला असून, इतर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Pune News)
नवाज इम्तियाज खान (वय. 26, रा. भवानी पेठ, मूळ बंगळुरू) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर अमीद अफजल अहमद (वय. 19), आश्रम मेहबूब शेख (वय. 26) हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक किरण नरवडे यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी, चंदननगर पोलिसांनी दुकान मालक अहमद मोहम्मद पुरियाल (वय. 46), मुकेश भगेदी चौरसिया (वय 24), धर्मेश जगराम चौधरी (वय. 18), दिलीप कुमार श्री सोमय्या प्रसाद (वय. 32), गणेश रामलोचन गौतम (वय. 20), सुरज रामकिसन सोनी (वय. 33), महेश जग्गू कुमार (वय. 19), सुनील रामसेवक कुमार (वय. 24), घनश्याम लक्ष्मण चौधरी(वय. 46), जितेंद्र रामलोचन कुमार (वय. 25 राहणार सर्व वडगाव शेरी) अशा अकरा जणांच्या विरुद्ध खान याच्या मृत्यूस व जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पंतनगर, सोपाननगर वडगाव शेरीतील मोहम्मद स्क्रॅप सेंटर एकेपी ट्रेडर्स यां भंगारच्या दुकानात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद, आश्रम आणि नवाज हे तिघे मुळचे बंगलोर येथील राहणारे आहेत. ते शहरातील एका मोटारीच्या शोरुमध्ये डेंटींग आणि पेंटीगची कामे करतात. सध्या ते भवानी पेठेत वास्तव्यास आहेत. त्यांनी सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास वडगाव शेरी येथील मोहम्मद स्क्रॅप सेंटर येथे चोरी करण्याच्या उद्देशाने छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. दरम्यान, या वेळी त्या दुकानात दहा कामगार झोपलेले होते. त्यांच्या निदर्शनास हा चोरीचा प्रकार आला. त्यांनी तिघांना पकडून ठेवले. सर्व कामगांनी स्टील पाइप आणि पिव्हीसी पाइपाने या सर्वांना डांबून बेदम मारहाण केली.
हा प्रकार कामगारांनी भंगार दुकानाचा मालक अहमद पुरियाल याला कळविला. तो देखील दुकानात आला. त्याने परत या तिघांना पाइपाने मारहाण केली. त्यामध्ये नवाज खान याचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी, भंगार दुकान मालकासह अकरा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे करीत आहेत.
चोरी करण्याच्या उद्देशाने भंगारच्या गोडाऊनमध्ये आलेल्या तिघांना कामगारांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. याबाबत अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा ढाकणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर