

बारामती: बारामती शहराला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत बारामतीचा नावलौकिक वाढेल असे काम केले जाईल, अशी ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. गुरुवारी (दि. 1) सातव यांनी बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला. प्रशासनाकडून मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातव म्हणाले, सातव कुटुंबातील तिसऱ्या पिढीकडे आज नगराध्यक्षपदाची धुरा आली आहे. नागरिकांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी सर्व 41 नगरसेवकांना सोबत घेऊन काम केले जाईल. शहराच्या पुढील पाच वर्षाच्या कामकाजासाठी पंचसूत्रीचा अवलंब केला जाईल. त्यात नागरिकांना अभिप्रेत असलेला विकास होईल. मूलभूत प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकालीन व्हीजन डोळ्यांपुढे ठेवून कामाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार यांनी हा विकास गतिमान केला. पवार कुटुंबीयांनी त्यात मोलाचे योगदान दिले. अजितदादा यांच्या स्वप्नातील बारामती निर्माण करण्यासाठी आम्ही नगरसेवक प्रशासनाला सोबत घेऊन पाच वर्षे झटून काम करू.
बारामती झोपडपट्टीमुक्त करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. ज्येष्ठ, महिला, युवा वर्ग या प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवले जातील. युवकांसाठी स्टर्टअपसह अन्य योजना हाती घेऊ. महिलांना प्रशिक्षण देत स्वयंरोजगार, लघुद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. पारदर्शक प्रशासनाला अधिक महत्त्व असेल. मोबाईल ॲप, हेल्पलाइन क्रमांकाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्याचे तत्काळ निराकरण केले जाईल. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक आणि नागरिक असे एकत्रितपणे शहराला पुढे नेऊ. प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ, महिला, युवा यांचे सिटीझन फोरम स्थापन केले जाईल. शहरात महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे, तो अल्पावधीतच मार्गी लावला जाईल. खासगी आस्थापनांची त्यासाठी मदत घेऊ. पेट्रोलपंप मालक-चालक यांची बैठक घेत त्यांच्याकडील स्वच्छतागृह उपलब्ध राहतील, याचीही व्यवस्था केली जाईल.
शहरात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आहे. अस्ताव्यस्त वाहने पोलिसांकडून टोईंग केली जातील. कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था यासंबंधी लवकरच जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांसोबत बैठक घेतली जाणार आहे. नगरपरिषद शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अग््राक्रम दिला जाईल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पालिका सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करत आहे, तेथे देशातील नामवंत शिक्षण संस्थांमध्ये काम केलेले शिक्षक नेमण्यात येणार आहेत. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हे स्कूल सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासह प्रशिक्षणाच्या दृष्टीनेही खा. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. शहराच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणे, हाच माझा दृष्टिकोन आहे. निवडणूक संपल्यानंतर आता राजकीय भूमिका दूर ठेवून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच घटकांना सोबत घेऊन काम करण्याचीच आमची भूमिका असेल. अजित पवार यांच्या विकासाच्या मुद्यावरच आम्ही पाच वर्षे काम करत राहणार आहोत.
इंदूरच्या धर्तीवर बारामती देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर व हरित शहर असावे अशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची अपेक्षा आहे. नागरिकांनीही स्वच्छता राखण्यास मदत करावी, अधिकाधिक झाडे लावावीत, सुशोभीकरणासाठी मदत करावी, नव्याने काही जबाबदारी स्वतःहून स्वीकारून लोकसहभाग अधिक वाढवावा, अशी अपेक्षा आहे.
सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद