

वानवडी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर बाजार चौक ते गोळीबार मैदान चौकापर्यंतचा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक रविवार (दि. 30 नोव्हेंबर) पर्यंत बंद करून पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळवली आहे.
या बदलामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार असून, सहकार्य करण्याचे आवाहन वानवडीचे वाहतूक सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित मोहिते यांनी केले आहे.
वाहतूक पोलिस विभागाकडून पुणे-सोलापूर या महामार्गावरील सोलापूर बाजार चौक ते गोळीबार मैदान चौक या ठिकाणी या काळात पुणे ग््राँड चॅलेंज टूर 2026 पॅकेज 1 ते 4 अंतर्गत रस्ता खोदाई करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निकषानुसार रस्ता दुरुस्त व विकसित करण्यात येत आहे. यासाठी वाहतूक वळविणे आवश्यक होते.
वानवडी विभागांतर्गत सोलापूरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व दुचाकी व चारचाकी हलक्या स्वरूपातील वाहनांना सोलापूर बाजार चौकातून डावीकडे वळण घेत खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळून गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटला जाता येणार आहे. तसेच, अवजड वाहनांना मम्मादेवी चौकाकडे न जाता भैरोबा नाला चौकातून डावीकडे वळून लुल्लानगर चौकातून पुढे जाता येणार आहे.
तसेच, पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांना अर्जुन रस्त्यावरून हिंदुस्थानी चर्चच्या मार्गाने पुढे रेसकोर्स मुख्य गेट येथील रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे जाता येणार आहे. यामध्ये पीएमपीच्या बसचालकांना पुलगेट स्थानकावर जाऊन पुन्हा भैरोबा नाल्याच्या दिशेने येऊन स्वारगेटकडे व रेसकोर्सवरून पुणे स्थानकावर जावे लागणार आहे. त्यामुळे पीएमपी बसचालकांना कसरत करावी लागणार आहे.
रविवारपर्यंत वाहतुकीतील या बदलांमुळे भैरोबा नाला ते लुल्लानगर, खटाव बंगला, रेसकोर्स रस्ता, मम्मादेवी चौक तसेच एम्प्रेस गार्डन हे रस्ते वाहतूक कोंडीत अडकून राहणार आहेत. नागरिकांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.