

वाघोली : पुणे-नगर महामार्गावरील वाघोलीतील चौका-चौकात अवैध प्रवासी वाहतुकीने थैमान घातले आहे. रहदारीला अडथळा निर्माण होईल, अशाप्रकारे बेशिस्तपणे वाहने लावली जात आहेत.
पोलिस मात्र तात्पुरती कारवाई करून कागदी घोडे नाचवून कारवाई केल्याचा आव आणत आहेत. वाहतूक पोलिस व परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
वाघोलीतील चौका-चौकात रिक्षाचालकांकडून बेशिस्तपणे व अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. आधीच नागरिक दररोजच्या वाहतूक कोंडीने वैतागले असताना पोलिसांसमोरच रिक्षाचालक बिनधास्त रहदारीला अडथळा निर्माण करत अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. अर्थपूर्ण संबंधामुळे पोलिस तात्पुरती, थातूरमातूर कारवाई करून कारवाई केल्याचे दाखवत आहेत.
नवले पुलावरील अपघाताची पुनरावृत्ती पुणे-नगर महामार्गावर होऊ नये, म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असताना अवैध प्रवाश वाहतूक व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांकडे वाहतूक पोलिसांसह परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
वाघोलीतील आठवडी बाजाराच्या दिवशी तर रिक्षाचालकांचा कहरच पाहायला मिळतो. ट्रिपल सीट, विना परवाना, विरुद्ध दिशेने भरधाव येणारी दुचाकींसह चारचाकी वाहने सुद्धा धावत असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून चालावे लागत आहे. फडई चौकातील टिटॉस समोर पदपथावर वाहने लावली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून महामार्गावरून रस्ता ओलांडावा लागतो. ठिकठिकाणी पदपथावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत अनधिकृत खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्स सर्रासपणे रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जमधडे यांनी सांगितले.
पुणे-नगर महामार्गावर वाघोलीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांनी आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या उपस्थितीत पाहणी केली होती. दरम्यान, रहदारीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे तत्काळ काढली होती. अतिक्रमण कारवाईचे नागरिकांनी स्वागतही केले. परंतु, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांनाही रहदारीला अडथळा ठरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे सक्त आदेश दिले होते. अवजड वाहनांबाबत वेळेच्या मर्यादेचे आदेश काढले होते. मात्र, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यामुळे अवजड वाहतुकीला व अवैध प्रवासी वाहतुकीला कोणाचे अभय आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर वाहनांवर कडक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरूच आहे. त्यामध्ये सातत्य ठेवले जाईल.
राहुल कोळंबीकर, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, वाघोली
वाघोलीतील खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर थांबतात. कंपनीच्या बस वाटेल तेथे थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. तसेच, अवजड वाहनांचे चालक नियम पाळत नाहीत. वाहतूक कोंडीचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्यात येईल.
विजय गोरे, स्थानिक नागरिक