

बारामती: उत्तरप्रदेशातील साहिबाबाद मतदार संघातून २०२२ साली विजयी झालेल्या सुनील कुमार शर्मा यांच्या नावे २ लाख १४ हजार ८३५ एवढ्या विक्रमी मताधिक्याची नोंद देशात होती. ती मोडीत काढत २ लाख १८ हजार ९३० मतांनी बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत महायुतीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजय मिळविला.
बारामतीच्या पोटनिवडणूकीत मतांचा विक्रम प्रस्थापित करावा असे आवाहन खुद्द मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत प्रचार सांगता सभेत केले होते. बारामतीकरांनी ते मनावर घेत देशातील सर्व विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला.
बारामतीच्या पोटनिवडणूकीसाठी ५८.१७ टक्के मतदान झाले होते. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ४) बारामती एमआयडीसीतील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच पवार यांनी त्यात प्रचंड आघाडी घेतली. फेरीनिहाय त्यांची आघाडी वाढतच गेली.
१८ व्या फेऱीतच त्यांनी २०१९ साली अजितदादांनी येथे प्रस्थापित केलेला १ लाख ६५ हजार २६५ मतांचा विक्रम मोडला. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढतच गेले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत बारामतीत ७१.२७ टक्के मतदान झाले होते. पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली होती. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अजितदादा पवार यांना ईव्हीएम व पोस्टल अशी १ लाख ८१ हजार १३२ तर युगेंद्र पवार यांना ८० हजार २३३ मते मिळाली होती.
१ लाख ९०९ मतांनी अजितदादा पवार विजयी झाले होते. अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर लागलेली पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अपक्ष व काही छोट्या पक्षांमुळे तो असफल ठऱला. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. परंतु त्या सर्वांचे डिपाॅझिट जप्त झाले.