

पुणे: महापालिकेकडून विकासकामांसाठी मागितलेल्या निधीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता उरुळी देवाची- फुरसुंगी नगपरिषदेने कचरा प्रकल्पाच्या बंदचे हत्यार उपसले आहे. आमच्या हद्दीतील चालू असलेले कचरा प्रकल्प तातडीने बंद करा आणि नवीन कोणतेही प्रकल्प सुरू करू नये, असा इशारा नगरपरिषदेकडून महापालिकेला देण्यात आला आहे.
उरुळी देवाची-फुरसुंगी नगरपरिषदेचे अध्यक्ष संतोष सरोदे व उपनगराध्यक्ष ओंकार कामठे यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. महापालिकेच्या उरुळी देवाची येथील कचरा डेपोमुळे या भागातील पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत.
त्यामुळे महापालिकेने पूर्वीप्रमाणे या दोन्ही गावांना म्हणजेच आताच्या नगरपरिषदेला रोज 180 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा व येथील विकास कामांसाठी दरवर्षी 40 कोटींची तरतूद करावी, अशी मागणी या नगरपरिषदेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली होती.
त्यावर महापालिकेने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता महापालिकेचे नाक दाबण्यासाठी येथील पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कचरा प्रकल्प बंदचा मार्ग अवलंबला आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात महापालिकेचा सुरू असलेल्या कचरा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी करतानाच तसे आश्वासन यापूर्वी दिले असल्याची आठवण करून दिली आहे.
तसेच यापुढील काळात कोणतेही नवीन प्रकल्प आमच्या हद्दीत सुरू करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उरुळी देवाची-फुरसुंगीच्या दबावतंत्रावर महापालिका काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.