

पुणे: उन्हाळ्यात मुलांमध्ये डिहायड्रेशन अर्थात निर्जलीकरणाची समस्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. शरीरातून जितके द्रव बाहेर पडते, त्यापेक्षा कमी द्रवाचे सेवन केले तर डिहायड्रेशन होते. सुरुवातीच्या टप्प्यातील अवस्था थकवा, चिडचीड, भूक मंदावणे अशा लक्षणांद्वारे दिसून येते.
मुलांमधील लक्षणे ओळखून वेळेवर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. शरीरात पुरेसे द्रव नसल्यास शरीराची कार्यक्षमता कमी होते. पाणी कमी पिणे, जास्त घाम येणे, उन्हात जास्त वेळ खेळणे तसेच ताप, उलट्या, जुलाब यांसारख्या आजारांमुळे निर्जलीकरण होऊ शकते.
मुलांमध्ये घामाद्वारे शरीरात जलदगतीने पाण्याची कमतरता निर्माण होते. सुरुवातीच्या टप्प्यातील डिहायड्रेशन सहज लक्षात न आल्यास मुलांच्या आरोग्यावर तसेच वर्तनावर परिणाम करू शकते.
...असे करा उपाय :
मुलांना पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
नारळपाणी, ताक, ताज्या फळांचे रस देणेही फायदेशीर ठरते.
कलिंगड, संत्री, काकडी यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आहारात समाविष्ट करावीत.
जंक फूड, तेलकट, हवाबंद डब्यातील तसेच व प्रोसेस्ड फूड टाळावेत.
दुपारच्या कडक उन्हात मुलांना बाहेर खेळण्यापासून रोखावे.
उन्हाळ्यात हलके, सैल आणि सुती कपडे घालणे योग्य ठरते.
डिहायड्रेशन झालेल्या मुलांमध्ये थकवा, चिडचीड होणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात. डोकेदुखी, चक्कर येणे, अभ्यास करताना एकाग््राता कमी होणे अशी तक्रारीही सतावतात. लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीचा रंग गडद होणे हे देखील महत्त्वाचे संकेत आहेत. योग्य वेळी उपचार न केल्यास हा किरकोळ वाटणारा त्रास भविष्यात गंभीर रूप धारण करू शकतो.
डॉ. तुषार पारिख, बालरोगतज्ज्ञ