

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 23) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी यादृच्छिक निवड पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे कमिशनिंग करण्यात येते. यामध्ये राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचाही समावेश असतो.
ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडली जाते. कमिशनिंग प्रक्रियेत बॅलेट युनिटवर बॅलेट पेपर बसविणे, कंट्रोल युनिटमध्ये उमेदवारांची नोंद करणे तसेच व्हीव्हीपॅटमध्ये चिन्हे लोड करणे यांचा समावेश असतो. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट कमिशनिंगसंदर्भातील सविस्तर सूचना ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन मॅन्युअल’मध्ये देण्यात आलेल्या असून, ते भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे कमिशनिंग 17 ते 18 एप्रिल या कालावधीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, एमआयडीसी क्रमांक 4 बारामती येथे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले.
या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी सर्व उमेदवारांना स्वतः उपस्थित राहण्याचे किंवा त्यांच्या प्रतिनिधींना नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उमेदवार डॉ. विजयकुमार भिसे हे कमिशनिंग प्रक्रियेसाठी उपस्थित होते. तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी यादृच्छिक पद्धतीने निवडलेल्या 5 टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांवर प्रत्येकी 1 हजार मते टाकून ‘मॉक पोल’ घेण्यात आला. या प्रक्रियेत एकूण 30 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला असून, 30 हजार व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करून ती कंट्रोल युनिटमधील निकालाशी जुळविण्यात आली.
कमिशनिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या सुरक्षा व साठवण प्रोटोकॉलनुसार स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मतदान साहित्य वितरणाच्या दिवशी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि व्हिडीओ चित्रीकरणासह स्ट्राँग रूम उघडणे व बंद करणे ही प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
मतदानासाठी 12 प्रकारचे पुरावे ग््रााह्य
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 23) रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या वेळी मतदान करताना मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 12 प्रकारचे पुरावे ग््रााह्य धरले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग््रााह्य धरले असून, त्यांपैकी कोणताही एक मूळ पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही दिघे यांनी सांगितले.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग््रााह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीअंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या 12 पुराव्यांचा समावेश आहे.