‘खोटे मेसेज, फोनला बळी पडू नका’

‘खोटे मेसेज, फोनला बळी पडू नका’
Published on
Updated on

अनिल सावळे पाटील

जळोची : बँकेने मेसेज पाठविला आहे. बँकेचा फोन आहे, असे भासवून अनेकांची फसवणूक केली जाते. विशेषतः पेन्शनधारकांची फसवणूक होत आहे. त्यामुळे त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन विविध बँकांनी केले आहे.
खोट्या संदेशांबाबत सरकारने खातेधारकांना पुन्हा सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या केंद्र सरकारच्या अधिकृत माध्यमाने ग्राहकांना जागरूक राहण्यास सांगितले आहे.

स्टेट ऑफ इंडियाच्या (एसबीआय ) खातेधारकांना बँकेच्या नावावर काही खोटे मेसेज गेल्या काही दिवसांत येत आहेत. खातेधारकांनी असे कोणतेही एसएमएस किंवा ई-मेल्सना रिप्लाय देऊ नये, असे आवाहन बँकेने केले आहे. खात्याबाबतची, आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती मागविणार्‍या मेसेजेसना उत्तर न दिल्याने फसवणुकीला आळा बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

पीआयबी फॅक्टने केली शहानिशा

गेल्या काही दिवसांपासून बँकेच्या खातेधारकांना 'तुमचं अकाउंट बंद झालं आहे,' असे मेसेज येत होते. त्याबाबतची शहानिशा पीआयबी फॅक्ट चेकने केली. त्यानंतर त्यांनी हे मेसेज चुकीचे असल्याचे सांगितले. "तुमची वैयक्तिक किंवा खात्याबद्दलची माहिती मागितली असेल, तर अशा मेसेजसना उत्तर देऊ नका व लगेचच report.phishing@sbi.co.in या ई-मेलवर त्या खोट्या मेसेजबद्दलची माहिती कळवा, असेही पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले आहे.

"तुमच्या खात्यातून दुसर्‍या कोणी पैसे काढले असतील, तर त्याची तुमच्या बँकेला लगेचच कल्पना द्या," असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. सेंट्रल बँकेनं मार्च महिन्यात ग्राहकांना मार्गदर्शन करणारी एक पुस्तिका प्रकाशित केली होती. त्यामध्ये अशा प्रकारे खातेधारकांना फसवणार्‍या टोळ्या कशा काम करतात, याबाबत प्रकाश टाकला होता.  ग्राहकांनी सर्च इंजिनवरच्या खोट्या कस्टमर केअर क्रमांकापासून सावध राहा आणि बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरूनच व्यवहार करा, असा मेसेज आयडीबीआय बँकेच्या टीमने ग्राहकांना पाठविला आहे.
युको बँकेने तर खास ग्राहक मेळावा घेऊन फसवणुकीपासून कसे सावध राहावयाचे, याबाबत ग्राहकांना अवगत केले आहे.

बँकचे कामकाज चालू असताना सकाळी 10 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान जर खोटा फोन किंवा मेसेज आला तर लगेच शहनिशा करा. सुट्ट्यांच्या दिवशी व इतर दिवशी रात्रीच्या वेळी आलेले फोन मेसेज खोटे फसवे असतात व त्यास उत्तर देऊ नका. कारण बँकचे कामकाज त्या वेळेत बंद असते अशी माहिती पंजाब नॅशनल बँकेचे जनसंपर्क अधिकारी भारत पुराणिक यांनी सांगितले.

पेन्शनधारकांची संख्या अधिक

पेन्शनधारक हे खोट्या फोनला उत्तरे देतात. फसवणूक झालेल्या ग्राहकांत त्यांची संख्या
इतर ग्राहकांपेक्षा जास्त आहे, असे मत पेन्शनधारक संघटनेचे कार्याध्यक्ष शांताराम कुलकर्णी यांनी सांगितले.
खोटे व फसवे मेसेज आल्यास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी त्वरित जवळच्या शाखेशी संपर्क साधून खातरजमा करावी, असे आवाहन बारामती शाखा व्यवस्थापक कृष्णकांत काळे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news