

पुणे: बाणेर येथील महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी रुग्णालयाविरोधात सभागृहात गंभीर आरोप करण्यात आल्यानंतरही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. आरोग्य विभागाने केवळ नोटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण केली असून, प्रत्यक्ष कारवाई करण्यास मात्र प्रशासन टाळाटाळ करत आहे.
महापालिकेने बाणेर येथील सर्व्हे क्रमांक 33 मध्ये सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून 25 हजार चौरस फुटांची इमारत उभारली आहे. कोरोना काळात या ठिकाणी तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय यंत्रसामग््राीही खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या भवन विभाग आणि आरोग्य विभागाकडून ही इमारत जेटी फाऊंडेशन या संस्थेला ‘आयआयएमएस हॉस्पिटल’ चालविण्यासाठी देण्यात आली.
मात्र, महापालिकेच्या मालमत्ता वाटप नियमांनुसार कोणतीही मालमत्ता विनाभाडे देता येत नसताना संबंधित संस्थेला कोट्यवधींची इमारत केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर देण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी 20 एप्रिल रोजीच्या महापालिका सभागृहात केला होता. तसेच, या रुग्णालयाकडून महापालिकेच्या सुविधा वापरल्या जात असल्या तरी शहरातील रुग्णांना अत्यल्प दरात सेवा दिली जात नाही, तसेच राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजनांचाही लाभ रुग्णांना मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्या वेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभागृहात दिले होते. मात्र, आरोप होऊन जवळपास महिनाभर उलटल्यानंतरही चौकशीची कोणतीही ठोस प्रक्रिया सुरू झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच संबंधित रुग्णालयास नोटीस बजावण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
रुग्णालय आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारातील अटी-शर्ती, त्यांचे उल्लंघन झाले आहे का, गरीब रुग्णांना सेवा नाकारण्यात आली का, तसेच सरकारी योजनांचा लाभ दिला जातो का, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या चौकशीचा अहवाल सभागृहासमोर मांडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी या प्रकरणात कार्यवाहीच्या सूचना दिल्यानंतरही आरोग्य विभागाकडून कारवाईला विलंब होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बाणेर येथील महापालिकेच्या इमारतीत सुरू असलेल्या रुग्णालयास नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. नीना बोराडे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका.