

गणेश खळदकर
पुणे: विद्यार्थ्यांना पत्रलेखन म्हणजे काय, बातमी कशाला म्हणायचे, बातमी कशी लिहायची, गुप्तहेर ही काय संकल्पना आहे, अशा साध्या आणि विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या संकल्पना सांगत इंग्रजी शिकणे अधिक सोपे अन् मनोरंजक वाटावे आणि त्यातूनच केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष इंग्रजी वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्यावर 'बालभारती'चा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सहा युनिटचा समावेश आहे. या प्रत्येक युनिटमध्ये पाच अशा एकूण ३० प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
मान्सून या कवितेच्या माध्यमातून पुस्तकाची सुरुवात झाली आहे, तर गुप्तहेराची भूमिका बजावणे, या पाठाच्या माध्यमातून पुस्तकाचा शेवट झाला आहे. इंग्रजी पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा अधिक सहज, आनंददायी आणि व्यवहार्य पद्धतीने विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन या चार मूलभूत भाषाकौशल्यांचा समतोल विकास हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कावळा आणि सापाची गोष्ट, निसर्गाचे रक्षण करणारे लोक, तिला कसलीही भीती वाटत नव्हती, यासारख्या अन्य प्रकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे, तर निसर्ग, भाऊ, आता हा पक्षी कुठे विसावा घेईल आदी कवितांच्या माध्यमातून वर्गात बहर येणार आहे.
या पुस्तकातील धडे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. कुटुंब, मित्र, शाळा, निसर्ग, प्राणी, पर्यावरण, विज्ञान, सण- उत्सव, संस्कृती, स्वच्छता आणि सामाजिक मूल्ये यांसारख्या विषयांवर आधारित वाचनसाहित्य समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकणे अधिक सोपे आणि मनोरंजक वाटते. पुस्तकात कविता, गोष्टी, संवाद, माहितीपर लेख, पत्रलेखन, चित्रवर्णन आणि कृतीआधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक धड्यानंतर शब्दसंग्रह वाढविण्यासाठी नवीन शब्द, त्यांचे अर्थ, वाक्यरचना आणि विविध भाषिक सराव दिलेले आहेत.
व्याकरणाचा भागही सोप्या आणि टप्प्या-टप्प्याने मांडण्यात आला आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, वाक्यरचना, विरामचिन्हे आणि योग्य शब्दप्रयोग यांचा सराव उदाहरणांसह दिला आहे. तसेच, पुस्तकात चित्रांचा प्रभावी वापर करण्यात आला असून निरीक्षण, कल्पनाशक्ती आणि भाषिक अभिव्यक्ती वाढविणाऱ्या अनेक कृती देण्यात आल्या आहेत. समूहकार्य, जोडीनुसार चर्चा आणि वर्गातील सादरीकरणांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
भिडेवाड्यातील शाळेबाबत बालभारतीचे शुद्धिपत्रक
इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग’ भाग २ पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील 'माहीत आहे का तुम्हाला? या चौकटीत 'भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेबाबत महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय.’ या वाक्याऐवजी दुरुस्त करून 'ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय,’ असा बदल करून ‘बालभारती’ने शुद्धिपत्रक जाहीर केले आहे.