

पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यात ३० जूनपासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू असूनही या मोहिमेत कर्तव्यावर असलेल्या ११४ भूमी अभिलेख अधिकार्यांच्या बदल्यांच्या आदेशांना स्थगिती देण्याची नामुष्की मंत्रालय स्तरावर ओढविली आहे. याबाबत आयोगाने कोणत्याही अधिकार्याची बदली करता येणार नाही, अशी सक्त ताकीद दिल्यानंतर या सर्व उपअधीक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, या दोन बदल्यांसोबत दोन उपसंचालक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा ३० जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार या मोहिमेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या करू नयेत, अशा स्पष्ट सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनीही याबाबत सर्व विभागांच्या सचिवांनाही याची कल्पना दिली होती. आयोगाच्या या निर्देशांनुसार राज्य सरकारने बदल्यांसाठी १५ ते ३० जून असा कालावधी निश्चित केला होता. मात्र, या बदल्या पुनरीक्षण मोहिमेत असलेल्या अधिकार्यांच्या करू नयेत, असे निर्देश दिले होते. मात्र, महसूल विभागातील मंत्रालय स्तरावरील अधिकार्यांनी भूमी अभिलेख विभागातील ११४ भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या राज्यांतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी (दि. २२) रात्री काढले.
त्यानुसार मंगळवारी (दि. २३) काही अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गेले. काहींना कार्यमुक्तही केले. मात्र, ही बाब संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आली. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या सर्व बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश पुन्हा काढण्याची नामुष्की आली.
दरम्यान, जमाबंदी आयुक्त कार्यालयाशी संलग्न असलेले उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांच्या संभाजीनगर येथे भूमी अभिलेख विभागाच्या प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदी बदली केली आहे. (हँगिंग) उपसंचालक राजेंद्र गोळे यांना अमरावती विभागाच्या उपसंचालक पदाचा कार्यभार सोपविला आहे. हट्टेकर यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती केलेली नाही.