

गणेश खळदकर
पुणे: गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकात केवळ पाठांतराऐवजी विद्यार्थ्यांची गणितीय समज, तार्किक विचारशक्ती, निरीक्षणक्षमता आणि दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार अन् व्यवहारज्ञान विकसित करण्याकडे बालभारतीचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या नवीन पुस्तकांची भेट विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. सहावीच्या गणिताच्या पुस्तकात 20 प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
सहावीच्या गणिताच्या पुस्तकात त्रिमितीय आकार, रेषा आणि कोन, संख्याच्या जगात, आकृतिबंध, म.सा.वि आणि ल.सा.वि, अपूर्णांक, गुणोत्तर व प्रमाण, त्रिकोण व चौकोन, समीकरणे, जादुई गणित भाग एक, दशांश अपूर्णांक, नफा-तोटा, शेकडेवारी, भौमितिक रचना, परिमिती व क्षेत्रफळ, बौधायन-पायथागोरसचा सिद्धांत, बँक व सरळव्याज, जादूई गणित भाग दोन या प्रमुख पाठांचा समावेश आहे. त्रिमितीय आकार या पाठात लांबी, रुंदी आणि उंची असलेल्या घन, दंडगोल, शंकू, गोल यांची माहिती देण्यात आली आहे. रेषा आणि कोन या पाठात भूमितीच्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जाणार आहेत. तसेच काटकोन, लघुकोन, विशालकोन, सरळकोन कोन मोजण्याची पद्धत या बाबी समजावून सांगण्यात येणार आहेत. संख्यांच्या जगात मोठ्या संख्यांची ओळख करून देण्यात येणार आहे.
आकृतिबंध या पाठात गणिती नमुने शोधण्याची सवय विद्यार्थ्यांना लावण्यात येणार आहे. म.सा.वि. आणि ल.सा.वि. यामध्ये महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) लघुत्तम साधारण विभाज्य (ल.सा.वि.) हे शिकवण्यात येणार आहे. अपूर्णांक या पाठात पूर्ण भागांचे तुकडे समाजावून सांगण्यात आले आहेत. त्रिकोण व चौकोन यामध्ये त्रिकोणांचे प्रकार, चौकोनांचे प्रकार,बाजू, कोन याची माहिती देण्यात आली आहे. समीकरणे या पाठात अज्ञात संख्या शोधणे, चिन्हांचा वापर, सोपी समीकरणे सोडवणे, व्यवहारातील उदाहरणे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. जादुई गणित भाग एकमध्ये गणिती खेळ, जलद गणना, तर्कशक्ती वाढवणाऱ्या कृती, कोडी व मनोरंजक प्रयोग करण्यात येणार आहेत. दशांश अपूर्णांक या पाठात दशांश संख्या समजून घेणे, स्थानिक किंमत, दशांशांची तुलना, बेरीज आणि वजाबाकी विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे. नफा-तोटा, शेकडेवारी, भौमितिक रचना, परिमिती व क्षेत्रफळ यातून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान देण्यावर भर देण्यात आला आहे. बौधायन-पायथागोरसचा सिद्धांत या पाठातून समकोनी त्रिकोणाची ओळख, कर्ण आणि इतर दोन बाजूंचा संबंध तसेच प्राचीन भारतीय गणितज्ज्ञ बौधायन यांचे योगदान स्पष्ट करून
पुढील उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यात आला आहे. बँक व सरळव्याज पाठातून विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर करून बचतीचे महत्त्व, बँकेचे कामकाज, ठेवी आणि व्याज याची माहिती देण्यात आली आहे. अशाप्रकारे सहावीचे गणित हे केवळ आकडे शिकवणारे पुस्तक नसून, तर्कशक्ती, समस्या सोडवण्याचे कौशल्य, आर्थिक साक्षरता, भूमिती, व्यवहारज्ञान आणि गणिताची गोडी निर्माण करणारे सर्वसमावेशक पुस्तक आहे.
गणिताचे पुस्तक घाम फोडणारे
इयत्ता सहावीचे गणिताचे पुस्तक हे विद्यार्थ्यांची कसोटी पाहणारे पुस्तक आहे. यातील काही संकल्पना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला आव्हान देणाऱ्या आहेत. त्यामुळे या संकल्पनामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढणार असून, हे गणिताचे पुस्तक विद्यार्थ्यांना घाम फोडणारे असल्याचे मत पुस्तक परीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.