

Senior Citizen Assaulted Wagholi Pune
पुणे : सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने वृद्धाला हातातील लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण करण्यात आल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील एका सोसायटीत राहायला आहेत. शुक्रवारी (दि. १६ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारातून निघाले होते. सोसायटीच्या परिसरात आरोपी आणि त्याची मैत्रीण थांबली होती. दोघेजण अश्लील चाळे करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने पाहिले. ज्येष्ठ नागरिकाने आरोपी तरुणाला हटकले.
सोसायटीच्या परिसरात अश्लील चाळे करु नका, असे ज्येष्ठ नागरिकाने तरुणाला सांगितले. या कारणावरुन तरुणाने त्यांना शिवीगाळ केली. काही वेळानंतर तरुणाने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला. ज्येष्ठाला शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात हातातील लोखंडी कडे मारले. ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला दुखापत झाली. पसार आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.