

पुणे : महानगरपालिका ही कोणासाठीही कमिशनखोरीचा धंदा किंवा वैयक्तिक व्यवसाय नाही. महापालिका हे सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. पुण्याच्या विकासाचे पुढील पाच वर्षांचे स्पष्ट नियोजन आपल्याला करायचे आहे. पदे कधी आणि कोणाला मिळतील, यापेक्षा पुणेकरांची कामे प्रामाणिकपणे होणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणी कमिशनखोरीचा प्रयत्न केला, तर तो पुणेकर खपवून घेणार नाहीत आणि पक्षनेतृत्वही अशा गैरप्रकारांची गंभीर दखल घेईल, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 17) पुण्यात दिला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही ‘भावी नगरसेवक’ असा उल्लेख करत त्यांच्या मनोबल वाढवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा आपली पसंतीची मोहोर
उमटवली आहे. पुणेकरांनी दिलेला हा जनादेश नक्कीच आनंददायी असला, तरी त्याच वेळी तो मोठी जबाबदारीही वाढवणारा आहे. जनतेच्या विश्वासाला आपण पात्र ठरू अशा पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य शासन पुणे महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे असून, पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी, यासाठी झपाटून प्रामाणिक व पारदर्शी कारभार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपण पुण्यात इतिहास रचला असून, या विजयाचे शिल्पकार तुम्ही सर्व आहात. गेल्या 30 ते 35 वर्षांत पुणे महापालिकेत इतके मोठे बहुमत कोणालाही मिळाले नव्हते. निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी चर्चा होती; मात्र पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली, असे सांगत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, असा जनादेश जर आपण योग्य कामातून सार्थ केला नाही, तर तो लाटेसारखा निघून जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. उलट, हा विश्वास आपण टिकवला, तर पुढील पंचवीस वर्ष आपल्याला कोणीही सत्तेतून हटवू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिका ही देशातील सर्वोत्तम महापालिका झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे. केंद्र व राज्य सरकार, सर्व आमदार आणि खासदार पुणे महापालिकेच्या पाठीशी ठाम उभे आहेत. महापालिका हा सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे. तो कोणाचाही व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही. पक्ष ज्याला जी जबाबदारी देईल, ती त्याने पारदर्शकता व प्रामाणिकतेने पार पाडावी. कोणी कितीही मोठा असला, तरी उन्माद किंवा गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही. तुमची प्रतिमा हे राजकारणातील सर्वात मोठे भांडवल आहे आणि तीच भाजपची प्रतिमा आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय मिळाल्यानंतरही एकही दिवस शांत बसत नाहीत. विजयाच्या दुसऱ्याच दिवशी ते पुढील पाच वर्षांचे नियोजन सुरू करतात. त्याच धर्तीवर आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे ठोस नियोजन करावे लागेल. पुण्यासाठी मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. पुण्यासाठी नियोजित योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या दोन वर्षांत सुरू होईल, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.