

अखंड आयुष्य संघर्षात घालवणाऱ्या बाबांच्या आयुष्यात निवांतपणाचे क्षण तसे कमीच आले. पत्नी शीला आढाव या देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचा जन्म पुण्यात 1 जून 1930 साली झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले. बी.एसस्सी, डी.ए.एस.एफ.चे शिक्षण त्यांनी घेतले. पुण्यात त्यांच्यावर किशोरवयात राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले.
त्यांचे कार्य आणि त्यांच्याशी संबंधीत विविध संस्था.
1943 ते 1950 - राष्ट्र सेवा दलाचे संघटक.
1952 मध्ये अन्नधान्य भाववाढविरोधी सत्याग्रह. पहिला तुरुंगवास
1953 मध्ये नाना पेठेतील निवासस्थानी दवाखाना सुरू केला.
1955 मध्ये हडपसर येथे दवाखाना, महाराष्ट्र आरोग्य मंडळ, साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना, गोमंतक मुक्ती आंदोलनात सहभागी, पुण्यातून शुश्रूषा पथक नेले.
1956 मध्ये हमाल पंचायत पुणेची स्थापना आणि अध्यक्षपदी निवड. विकास व्याख्यानमाला सुरू केली. प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले.
1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग.
1959 मध्ये झोपडी संघ स्थापना, झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन परिषद. विविध आंदोलने केली, कारावास भोगला.
1963 मध्ये राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन परिषदेच्या स्थापनेत सहभाग
1962 ते 1967 मध्ये नाना पेठ मतदारसंघातून पुणे महानगरपालिकेवर बहुमताने निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये केवळ एका मताने पराभव, पुणे मनपा पूर्व भागाच्या पाणीपुरवठाप्रश्नी अन्यायाविरोधात राजीनामा दिला.
1971 मध्ये महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना.
1972 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला, त्याच पार्श्वभूमीवर ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीला सुरुवात.
1974 मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’ त्रैमासिक प्रकाशन-संपादन, देवदासी प्रथा निर्मूलन आणि पुनर्वसन चळवळ.
1975 मध्ये आणीबाणीमध्ये झोपडपट्टीवासीयांचा मेळावा, ‘मिसा’अंतर्गत येरवडा कारागृहात 14 महिने कारावास.
1977 ते 1981 मध्ये डॉ. बाबा आढाव यांचे ‘एक गाव एक पाणवठा’, ‘सत्यशोधनाची वाटचाल’, ‘संघाची ढोंगबाजी’, हे तर ‘शेठजी भटजीचे आधुनिक दास’ आदी ग्रंथ प्रकाशित झाले.
‘महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचे संशोधन’ या ग्रंथांना संस्थांचे पुरस्कार मिळाले.
1979 मध्ये नामांतर आंदोलन पुणे ते छत्रपती संभाजीनगर लाँग मार्च नेला, आंदोलन यशस्वी.
1982 मध्ये पुण्यात राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना
आणि पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद.
1984 मध्ये भिवंडी दंगल, ओरिसा वादळग्रस्त, मराठवाडा भूकंपग्रस्तांसाठी पुण्यातून मदतनिधी जमा करून पाठवला.
विषमता निर्मूलन परिषदेच्या व्यासपीठावर विविध परिवर्तनवादी संघटनांना एकत्र आणले.
संसदबाह्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना.
पुण्यातील 50 हजार रिक्षाचालकांना संघटित करून ‘रिक्षा पंचायत’ची स्थापना.
पुण्यामध्ये कागद, काच, पत्रा, बांधकाम, पथारी व्यावसायिक, अंगमेहनती, कष्टकरी, मोलकरीण आदी कष्टकऱ्यांसाठी संघर्ष
देशातील 37 कोटी कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी केलेल्या आंदोलनाची यशस्वी फलश्रुती, संसदेने याबाबतचे विधेयक मंजूर केले.
‘पुण्यभूषण’ पुरस्कार, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, यशवंतराव चव्हाण, कवी कुसुमाग्रज आदी दिग्गजांच्या नावाने असलेले विविध पुरस्कार, उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या नावे असलेला रिलायन्स इंडस्ट्रीजचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, मारवाडी फाउंडेशनचा पुरस्कार, मॅन ऑफ दी इयर 2007 राष्ट्रीय पुरस्कार, उत्कृष्ट समाज कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार.