

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने गेल्या दोन महिन्यांत कर थकविणार्या तब्बल 815 बिगरनिवासी मिळकतींना सील ठोकले आहे. या सर्व मिळकतींची थकबाकी तब्बल 57 कोटी 53 हजार इतकी असून, थकबाकीदारांच्या मिळकतींना सील करण्याची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीचा आकडा हजार कोटींच्या पुढे आहे. यामध्ये र आकारणी, मोबाईल टॉवरची थकबाकी यांचाही समावेश आहे. त्यामुळे मिळकतकर विभागाने बिगरनिवासी थकबाकीदारांच्या मिळकतींना सील करण्याची मोहीम सुरू केली आहे. मेअखेरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 815 मिळतींना सील ठोकण्यात आले आहे.
कारवाईदरम्यान 19 लाखांचा थकीत कर वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, थकबाकी वसुलीसाठी विभागप्रमुखांना दररोज थकबाकी असणार्या 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. मिळकतकरातून 14 जुलैअखेरपर्यंत 731 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी 1 एप्रिल ते 14 मे या कालावधीत तब्बल 1 हजार 108 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी मात्र 40 टक्के सवलतीच्या निर्णयास विलंब झाल्याने उशिरा बिले देण्यात आली. त्याचा फटका काही प्रमाणात उत्पन्नावर झाला आहे. दरम्यान येत्या 31 जुलैपर्यंत मिळकतकराचा भरणा करणार्या मिळकतकरधारकांना सर्वसाधारण करावर 5 किंवा 10 टक्के सवलत मिळणार आहे.
महापालिकेच्या बक्षीस योजनेचा लाभ घ्या
वेळेत मिळकतकराचा भरणा करणार्या करदात्यांसाठी महापालिकेने पहिल्यांदाच बक्षीस योजना राबविली आहे. त्यानुसार येत्या 31 जुलैपर्यंत कराचा भरणा करणार्यांना 1 कोटीपर्यंत बक्षिसे मिळणार आहेत. यामध्ये 5 पेट्रोल कार, 15 ई-बाईक, 15 मोबाईल फोन, 10 लॅपटॉप अशी एकूण 45 बक्षिसे मिळकतधारकांना लॉटरीच्या आधारे मिळणार आहेत.
हेही वाचा :