

पुणे : उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक असणाऱ्या ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी महापालिकेकडून प्रथमच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना महापालिकेच्या https://nocelection.pmc.gov.in या संकेतस्थळावर तब्बल ४१ विविध खात्यांची एनओसी मिळणार आहे.
महापालिका निवडणूकीचा अर्ज भरताना महापालिकेच्या अनेक विभागांच्या एनओसी देणे बंधनकारक आहे. हे एनओसी मिळविताना उमेदवारांची मोठी ससेहोलपट होते. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले आहेत.
उमेदवारांची होणारी धावपळ रोखण्यासाठी महापालिकेने आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. https://nocelection.pmc.gov.in या ऑनलाइन प्रणालीद्वारे महापालिकेच्या एकूण ४१ खात्यांना जोडण्यात आले. त्यानुसार उमेदवाराचा अर्ज एकावेळी सर्व खात्यांना ना-हरकत प्रमाणपत्रासाठी लिंक करण्यात आला आहे.
उमेदवारांना एनओसी प्रमाणपत्रासाठी दि. ३० डिसेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकृती लिंक उपलब्ध राहणार आहे. तर दि. २९ डिसेंबरपर्यंत सादर होणाऱ्या ऑनलाइन अर्जंदारांना प्राधान्याने एनओसी मिळणार असून, शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. ३०) येणारे अर्ज विलंबाने आल्यास त्यांना एनओसी न मिळाल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची नसेल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.