

पुणे : आयुष्य कितीही गुंतागुंतीचे असले तरी कलांच्या माध्यमातून जीवन जगण्याची उमेद मिळते. जीवनातील तोल सांभाळणे शक्य होते. तसेच आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होत जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्या पुरस्काराने प्रसिद्ध कवयित्री, गझलकार प्राजक्ता पटवर्धन यांचा डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भाऊसाहेब पाटणकर यांचे नातजावई, अभिनेते किरण यज्ञोपवित याच्यासह रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर उपस्थित होते.
प्राजक्ता पटवर्धन म्हणाल्या, 'सिद्धहस्त गझल लेखकांच्या मार्गदर्शनात गझल लेखन या प्रांतातील शिक्षण अजून सुरू आहे. शिकण्याचा प्रवाह हा वाचन, लेखनातून समृद्ध होत आहे.'
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित गझल मुशायरा कार्यक्रमात प्रमोद खराडे, नचिकेत जोशी, योगेश काळे, सुनिती लिमये, स्वाती दाढे, तनुजा चव्हाण, स्वप्निल पोरे, चैतन्य दीक्षित, चैतन्य कुलकर्णी, वासंती वैद्य यांचा समावेश होता.