रेल्वे पोलिसांचे वाहन विकण्याचा प्रयत्न ; एकावर महाळुंगे पोलिसांत गुन्हा

file photo
file photo

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  मुंबई रेल्वे पोलिस उपायुक्त कार्यालय यांच्या नावे असणारी रुग्णवाहिका स्क्रॅपमध्ये खरेदी करून तिला विकू पाहणार्‍यावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार व्यवहारादरम्यान गाडीची कागदपत्रे देऊ न शकल्याने समोर आला आहे. ही घटना चाकण एमआयडीसीमधील निघोजे (ता. खेड) येथील इम्पेरिअल ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये घडली. याप्रकरणी रवी राघवेंद्र भुतेकर (वय 50, रा. देहू रोड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. 11) फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी झाकीर खान (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे काम करीत असलेल्या इम्पेरिअल इंडस्ट्रीज या कंपनीला एका रुग्णवाहिकेची गरज होती. यासाठी फिर्यादी यांनी इंटरनेटवर एक रुग्णवाहिका विक्रीसाठी असल्याचे शोधले. आरोपीने 25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता संबंधित रुग्णवाहिका मारुती ओमिनी (एमएच 01 एसए 4173) ही गाडी दाखविण्यासाठी कंपनीत घेऊन आला. या वेळी अ‍ॅम्ब्युलन्स जुनी असल्याचे लक्षात आले. त्यानुसार 2 लाख 20 हजार रुपयांमध्ये रुग्णवाहिकेचा व्यवहार ठरला.

आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीकडून आरटीजीएस पद्धतीने दोन लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम ही गाडीच्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर घेण्याचे ठरले; मात्र त्यानंतर त्याने फिर्यादीच्या कंपनीशी कोणताही संपर्क साधला नाही. त्याने व्यवहारावेळी आरसी बुक किंवा इतर गाडीची कागदपत्रे दिलेली नव्हती. कंपनीने त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो वेळोवेळी टाळाटाळ करीत होता. याची खात्री करण्यासाठी कंपनीने माहिती काढली असता संबंधित रुग्णवाहिका मुंबई रेल्वे पोलिसांचे उपयुक्त कार्यालय माझगाव यांच्या नावावर असल्याचे समजले.

ही गाडी आरोपीने स्क्रॅपमध्ये खरेदी केली होती. याची कोणतीही पूर्वकल्पना न देता आरोपी ही गाडी फिर्यादी यांच्या कंपनीला परस्पर विकू पाहत होता. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच कंपनी प्रशासनाने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिस याचा तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news