Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा | पुढारी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंदोलने करणार्‍या कार्यकत्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेऊन रद्दबातल करावेत, जालना येथील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात, त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला समन्वयक राजेंद्र कोढरे, राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अमर पवार, युवराज दिसले, श्रृतिक पाडाळे, मिलन पवार, बाळासाहेब आमराळे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोंढरे म्हणाले, शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल सकारात्मक व इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याचा विचार करून अहवाल सादर करावा. अहवालाविषयी मराठा समाजातील अभ्यासकांनाही विश्वासात घ्यावे. आंदोलनात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारची तातडीने चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी. मंडल कमिशन आणि बापट आयोगाने मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. परंतु, गायकवाड आयोग सर्वसमावेशक असून त्याचा विचार सरकारने करणे अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची एक क्लिप व्हायरल झाली असून आरक्षणाबाबत असेच म्हणावे लागते असे वक्तव्य केले आहे. याचा जाहीर निषेध करीत असून मराठा समाजाला गृहीत धरू नये, असा इशारा सचिन आडेकर यांनी दिला.

जालना येथील आंदोलनानंतर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या वतीने मागण्यांबाबत सरकारने निवेदन दिलेले आहेत. या मागण्याबाबत प्रकाश शेंडगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. वास्तविक पाहता प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत बोलणे चुकीचे आहे. भटक्या विमुक्तांना 3.5 टक्के वेगळे आरक्षण दिले जात आहे. प्रकाश शेंडगे ओबीसी आरक्षणाचा नाही तर भटक्या विमुक्तांना दिले जाणार्‍या आरक्षणाचा भाग आहेत, असे ही राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी सांगितले.

उद्या लाक्षणिक उपोषण

मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हुतात्मा बाबु गेणु चौक, टिळक पुतळा, मंडई येथे होणार आहे. या उपोषणामध्ये सर्व मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी आणि मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Pune-Mumbai highway accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

पुणे : डायजीन औषधांची विक्री थांबवण्याच्या सूचना

Back to top button