

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला चाप लावण्यासाठी महापालिकेकडून केली जाणारी कारवाई केवळ फार्सच ठरत आहे.
आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांकडून या ना त्या कारणाने चौकाचौकांत आणि रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण थांबण्याचे नाव घेत नाही.
महापालिका हद्दीत कोठेही फ्लेक्स किंवा होर्डिंग उभे करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. त्यानंतर परवानगी दिलेल्या कालावधीनंतर संबंधितांनी फ्लेक्स नाही काढले, तर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील विविध रस्ते, चौक, पदपथ, इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फेक्स आणि होर्डिंग उभे केले जातात. यामुळे महापालिकेचे उत्पन्नही बुडते.
अशा बेकायदा जाहिरातबाजीवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, या कारवाईला अधिकारी व कर्मचार्यांचे व्यावसायिकांशी असणारे लागेबांधे आणि राजकीय दबाव, यामुळे लगाम लागतो. परिणामी, शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजी, जाहिरातबाजी आणि होर्डिंगचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात फ्लेक्सबाजी व जाहिरातबाजीचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा हे फ्लेक्स पदपथ अडवून उभारले जातात. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे ठरते. परिणामी, पादचार्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.
फ्लेक्सबाजी आणि होर्डिंगमुळे होणारे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी फ्लेक्स छपाई करणार्यांसाठी काही नियमावली जारी करण्याचे व नियमावलीचा भंग करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची घोषणा महापालिका अधिकार्यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अनेक महिने उलटूनही पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.