

लोणी-धामणी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, निरगुडसर, लोणी-धामणी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, खडकवाडी, वाळुंजनगर आदी गावांमध्ये शेतकऱ्यांनी बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे काही शेतकऱ्यांना पीक धोक्यात येईल की नाही, अशी चिंता होती. पण, दीड-दोन महिन्यांपूर्वी झालेल्या लागवडीमुळे पिकाला धोका झाला नाही. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने बटाटा पीक चांगले जोमदार आले आहे.(Latest Pune News)
सध्या हे पीक दीड ते दोन महिन्यांचे झाले आहे. अंदाजे प्रतिएकर 12-14 कट्टे बियाणे लागत असून, प्रतिशंभर किलो बियाण्यांचा खर्च 2 हजार 500 ते 3 हजार रुपये आणि एका पन्नास किलो बॅगसाठी 1 हजार 250 ते 1 हजार 500 रुपये खर्च येतो. एकरी बियाणे, मजुरी, खते, औषधे आणि फवारणीसह 40 ते 50 हजार रुपये खर्च असल्याचे वाळुंजनगर येथील शेतकरी जालिंदर वाळुंज व बाळासाहेब वाळुंज यांनी सांगितले.
सध्या पावसाळी व ढगाळ वातावरण असले तरी बटाटा पीक जोमात आहे. मातीत बटाटे फुगण्याच्या कालावधीमुळे शेतकरी पिकाची विशेष काळजी घेत आहेत. खुरपणी व खतांचा भरपूर वापर केल्यामुळे पीक चांगले जोमात आले असून, बाजारभाव जास्त मिळाले तर शेतकऱ्यांना खर्चानुसार चांगले उत्पन्न मिळेल, असे बाबाजी वाळुंज यांनी व्यक्त केले.
झेंडूच्या फुलांची तोडणी सुरू
विजयादशमीसाठी झेंडूची फुले बाजारात दाखल होऊ लागली आहेत. आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी परिसरातील शेतमळे झेंडूच्या बहराने सजली असून, झेंडूला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोणी, धामणीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विविध जातींच्या झेंडूंची लागवड केली आहे. दसरा-दिवाळीच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते.
मे महिन्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने झेंडूबरोबरच इतर पिकेही चांगली आली. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झेंडूच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक मळ्यांना पावसाचे फटकारे बसल्याने शेतकरी चिंताग््रास्त आहेत.
सध्या बाजारात झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूला दहा किलोस 80 ते 100 रुपयांचा भाव मिळाला होता. दसऱ्याच्या दिवशी सकाळपासूनच बाजारात दर चढ-उतार होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
झेंडूचे पीक सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देते. बाजारभाव समाधानकारक राहील, अशी आशा लोणी येथील शेतकरी बाळासाहेब आढाव यांनी व्यक्त केली. दरम्यान, दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना फुलांची तोंडणी करण्यास सुलभता आली असून, सणासुदीच्या बाजारपेठेत झेंडूची चमक कायम राहणार आहे.