पुणे : समितीवरुन महायुतीतच शह काटशहाचे राजकारण; पालिका प्रशासनासमोर पेच

पुणे : समितीवरुन महायुतीतच शह काटशहाचे राजकारण; पालिका प्रशासनासमोर पेच

पुणे : महापालिकेत समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी-सुविधांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करायच्या समितीमधील सदस्यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी महायुतीतच शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे. या समितीसाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी सदस्यांच्या नावांची स्वतंत्र यादी दिल्याने नक्की कोणाची आणि किती नावे घ्यायची, असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे. पुणे महापालिकेत ऑक्टोबर 2017 मध्ये हद्दीलगतची 11, तर जानेवारी 2021 मध्ये 23 अशा 34 गावांचा समावेश झाला आहे.

मात्र, या 11 गावांसाठी केवळ दोन नगरसेवक, तर 23 गावांना प्रतिनिधीत्वच नसल्याने या गावांना विकासकामांपासून वंचित राहावे लागले होते. या गावांमधील समस्यांसंदर्भात राष्ट्रवादीचे वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांनी 34 गावांसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीही या समितीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार नगरविकास विभागाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांना ही समिती स्थापन करून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जून महिन्यात दिले. मात्र, या समितीत नक्की कोणाचा समावेश करायचा आणि ती किती सदस्यांची असणार याबाबत स्पष्टता देण्यात आली नाही. दरम्यान नगरविकास खात्याच्या आदेशानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख भानगिरे यांनी 12 सदस्यांची यादी जुलै महिन्यात विभागीय आयुक्तांना दिली. त्यात भाजपच्या चार सदस्यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या सहा सदस्यांची स्वतंत्र यादी विभागीय आयुक्तांना दिली. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी त्यावर निर्णय न घेता 18 सदस्यांच्या नावांची यादी थेट नगरविकास विभागाकडे पाठवून दिली.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून स्वतंत्र यादी

भाजप

1) संदीप सातव
2) बाळासाहेब घुले
3) भूषण तुपे
4) वंदना कोंद्रे
5) राजेंद्र भिंताडे
6) स्नेहल दगडे

शिवसेना

1) अमर घुले
2) उल्हास तुपे
3) विकी माने
4) बाळासाहेब चांदेरे
5) सुनिल खांदवे
6) सचिन दांगट
7) आश्विनी पोकळे
8) पीयुषा दगडे
9) स्वाती टकळे
10) राकेश झांबरे
11) श्रीकांत लिपाने
12) मच्छिंद्र दगडे

राष्ट्रवादी

1) पांडुरंग खेसे,
2) बाबूराव चांदेरे
3) दत्ता धनकवडे
4) भगवान भाडळे
5) शांताराम कटके
6) राकेश कामठे
7) गणेश ढोरे

निर्णयाचा चेंडू नगरविकासकडे

आता शिवसेना-भाजप समवेत सत्तेत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून सात सदस्यांच्या नावांची यादी विभागीय आयुक्तांना देण्यात आली आहे. त्यामुळे नक्की कोणाची किती आणि कोणती नावे घ्यायची असा पेच प्रशासनापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी यासंबंधीच्या निर्णयाचा चेंडू थेट नगरविकास खात्याकडे टोलविला आहे. या सर्व शह-काटशहाच्या राजकारणात समिती स्थापन करण्याचे घोडे मात्र अडले आहे.

शिवसेनेकडून परस्पर नावे !

शिवसेनेकडून 12 सदस्यांच्या देण्यात आलेल्या यादीत भाजपच्या चार सदस्यांच्या नावाचा समावेश आहे. ही नावे देताना संबधित पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे भानगिरे यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर पालकमंत्र्यांनी वेगळी सहा नावांची यादी दिली आहे, त्यामुळे भाजपच्या नक्की कोणत्या सदस्यांची नावे ठेवायची आणि कोणाची काढून टाकायची, असा
पेच आहे.

लोकप्रतिनिधींचीच समिती असावी

गावांसाठीची समिती ही लोकप्रतिनिधींची असेल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले होते, त्यामुळे या समितीत निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींचा समावेश असावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी केली आहे. तसेच आता पालिका निवडणूक लांबलेली असल्याने केवळ गावांसाठीच नाही, तर संपूर्ण शहरासाठी समिती स्थापन करावी, अशीही मागणी तांबे यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news