लवंगी मिरची : दुष्परिणाम समजायला नकोत काय?

लवंगी मिरची : दुष्परिणाम समजायला नकोत काय?

मध्यंतरी कोरोना काळात अघोषित दारूबंदी झाली होती तेव्हा शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला होता. शेवटी मद्यपी लोकांनी लडखडत उभे राहात शासनाची तिजोरी मजबूत केली तेव्हा कुठे सगळे वळणावर आले. म्हणजे जे लोक सकाळ-संध्याकाळ यथेच्छ मद्यपान करतात, ते सगळे अर्थव्यवस्थेचा कणा आहेत आणि त्यांच्याच जीवावर अर्थव्यवस्था टिकून आहे. त्यांच्यावर त्या कृतीसाठी बंदी घालणे हे चुकीचे आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घे की दारूचे भाव वाढले म्हणून मद्यपी लोकांनी कधी आंदोलन केल्याचे ऐकलेस काय? त्यांनी कुठे रास्ता रोको, चक्का जाम अशा प्रकारची आंदोलने केल्याचे तू ऐकलेस काय? ते अजिबात काहीही तक्रार करत नाहीत. गॅस सिलिंडरचे दर वाढले की ओरड होते, महागाई वाढली की ओरड होते, परंतु दारू पिणारे हा एकमेव वर्ग असा आहे की, जो दारूच्या किमती वाढल्यामुळे कधीही कोणतीही तक्रार करत नाही. म्हणजे स्वतःची प्रकृती खराब करून घेऊन देशाची सेवा करणारे हेच लोक आहेत हे आधी समजून घेतले पाहिजे. म्हणजे मग तुला या वर्गाबद्दल सहानुभूती वाटायला लागेल.

हा तुझा मुद्दा मला पटला आहे. स्वतःची किडनी, लिव्हर आणि आर्थिक परिस्थिती खराब करून घेऊन केवळ आणि केवळ राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी म्हणून स्वतःची गती शून्यावर आणणारे या राज्याचे खरे सेवक म्हणावे लागतील. तरीपण दारूबंदी अधिकारी महोदय यांनी अतिरिक्त मद्य सेवन का केले असेल हा एक मोठा प्रश्न आहे?

साधी गोष्ट आहे. दारू पिण्याचे दुष्परिणाम काय होतात हे स्वतः समजून घेण्यासाठी त्यांनी अतिरिक्त मद्यपान केले असेल आणि मग हळूहळू त्यांना सवय लागली असेल. सुरुवातीला थोडी घेतली की काय परिणाम होतात? आणखी थोडी घेतली की काय परिणाम होतात आणि अतिजास्त प्रमाणात घेतली की काय परिणाम होतात याचा स्वतःच्या शरीरावर प्रयोग करून पाहणारे अधिकारी महानच म्हणावे लागतील. म्हणजे दारूबंदी का करायची हे त्यांना स्वतःला मनापासून पटले होते. याचे कारण म्हणजे त्यांनी हे सर्व स्वतः अनुभवले होते. एखादा दारूबंदी अधिकारी मद्याच्या थेंबालाही स्पर्श करणारा नसेल तर त्याला दारूचे होणारे दुष्परिणाम कळणार तरी कसे आणि तो लोकांना समजावून सांगणार तरी कसा, हा मूळ प्रश्न आहे.

अच्छा, म्हणजे आधी केले आणि मग लोकांना सांगितले हे त्यांचे जीवनमूल्य असावे असे वाटते. पण एकाच वेळेला भरमसाट पैसे घेऊन दारूच्या दुकानांना परवानगी द्यायची, बीअरच्या कारखान्यांना उत्तम प्रतीचे पाणी स्वस्तात द्यायचे हे सर्व स्वतः शासन करत असेल तर मग उपयुक्तता संपलेले दारूबंदी खाते यावर शासन विनाकारण का खर्च करत आहे, हे मला तरी समजले नाही. तुला लक्षात आले असेल तर मला सांग.

म्हणजे याचा अर्थ शून्य उपयोगाचे असलेले दारूबंदी खाते शासनाने तत्काळ बंद केले पाहिजे. सर्वत्र मद्याचा महापूर वाहत राहिला पाहिजे. असे करून शासनाने आपली स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करून घेतली पाहिजे आणि अशा मजबूत झालेल्या अर्थव्यवस्थेमधून रस्ते आणि इतर विकासकामे यांना चालना दिली पाहिजे.

बरोबर आहे, तू म्हणतोस ते. प्रत्येक मद्य पिणार्‍या माणसाबद्दल मला आता अत्यंत आदर वाटायला लागला आहे. एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरून माझे वाहन जाताना मी आधी मनोमन झोकांड्या खात घराकडे जाणार्‍या लोकांना वंदन करीन.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news