

पुणे: कॅमेरा फुकट मिळाला म्हणून कोणी दिग्दर्शक होत नाही. कॅमेरा कसा, कुठे आणि का वापरायचा, याची जबाबदारी समजणे गरजेचे आहे. दुर्लक्षित समाजाचा आवाज प्रामाणिकपणे मांडणे, हेच खरे सिनेकर्म आहे. अण्णा भाऊ साठेंच्या नावाशी संघर्ष, माणुसकी आणि संस्कृती जोडलेली असल्याने हा महोत्सव मोठी जबाबदारी असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती व निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने अण्णा भाऊ साठे लोकशाहीर यांच्या विचारांना आणि संघर्षशील साहित्याला समर्पित असलेल्या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॉ. आगाशे आणि ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांच्या हस्ते झाले.
जोंधळे म्हणाले, ‘अण्णा भाऊ साठेंच्या नावाने सुरू झालेला हा महोत्सव म्हणजे विचारांची चळवळ आहे. कमी साधनांतही प्रभावी चित्रपट निर्माण होऊ शकतात, फक्त कल्पना आणि संवेदना असायला हव्यात. चित्रपट हे समाजाशी संवाद साधणारे प्रभावी माध्यम आहे.’
महोत्सवासाठी संयोजक संदीपभाऊ ससाणे यांच्यासह राही अनिल बर्वे, वीणा जामकर, दीपक दामले, गिरीश पटेल, अंकुर जे. सिंह, श्यामराव यादव, आशिष निनगुरकर, समीर दीक्षित व ऋषिकेश भिरंगी आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात ‘मायसभा’ या चित्रपटाने झाली. महोत्सव शनिवारी आणि रविवारी राष्ट्रीय फिल्म चित्रपट संग््राहालय येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत पार पडणार असून, प्रवेश विनामूल्य आहे.